पुणे -डीआरडीओचे संचालक, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांना 29 मेपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी दिले. त्यानुसार कुरुलकर यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. तेथे त्यांना विशेष कक्षात ठेवले जाणार आहे.
कुरुलकर यांच्या पोलीस कोठडीची मुदत मंगळवारी (16 मे) संपली. त्यानंतर दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पथकाने त्यांना न्यायालयात हजर केली. त्यावेळी सरकार पक्षाकडून गेल्या चौदा दिवसांत झालेल्या तपासाचा अहवाल सादर करण्यात आला. कुरुलकर यांचे वकील ऍड. ऋषीकेश गानू यांनी यापुढे पोलीस कोठडीची आवश्यकता नसल्याची विनंती न्यायालयाकडे केली. त्यानंतर न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. कारागृहात घरचे जेवण मिळावे, अशी विनंती बचाव पक्षाने केली. ही विनंती न्यायालयाने अमान्य केली.
सरकारी पक्षातर्फे ऍड. चंद्रकिरण साळवी यांनी बाजू मांडली. दरम्यान, गरज भासल्यास कुरूलकर यांची कारागृहात चौकशी केली जाणार आहे. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाइलचा न्यायवैद्यकीय अहवाल सोमवारी (15 मे) मिळाला. मोबाइल संच कुरुलकर यांच्यासमक्ष उघडण्यात आला. त्यामधील संवेदनशील माहितीचे स्क्रीनशॉट काढण्यात आले आहेत. गरज भासल्यास एटीएसचे अधिकारी त्यांची कारागृहात जाऊन चौकशी करू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली.
औषधे उपलब्ध करून देण्याचा आदेश
कुरुलकर यांना मधुमेह आहे. त्यांना वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार नियमित ओैषधे घ्यावी लागतात. कारागृहात त्यांना ओैषधे उपलब्ध करुन द्यावीत, अशी विनंती बचाव पक्षाचे वकील ऋषिकेश गानू यांनी न्यायालयाकडे केली. न्यायालयाने कुरुलकर यांना कारागृहात ओैषधे उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले.