पुणे – आरोग्य विभागाच्या वतीने “गट-क’ पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा पेपर फोडल्याप्रकरणात मुख्य आरोपींसह एजंटची साखळी पोलीस तपास यंत्रणांनी निष्पन्न केली आहे. या प्रकरणात मुख्य एजंट म्हणून कार्यरत असलेल्या गोपीचंद सानप (रा. बीड) यास पुणे सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने बुलढाणा येथून जेरबंद केले आहे.
सानप हा मूळचा बीड जिल्ह्यातील रहिवासी असून तो वर्धा येथे आरोग्यसेवक म्हणून सध्या काम करत आहे. परीक्षेचा पेपर फोडणाऱ्या टोळीतील प्रमुख संशयित असलेल्या निशीद गायकवाड याच्या माध्यमातून सानप याला आरोग्य विभाग गट-क चा पेपर मिळाला होता.
त्यानंतर बीड, जालना, नगर, परभणी, औरंगाबादसह मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांत आरोपीने परीक्षार्थींना हेरुन त्यांच्याकडून पैसे स्वीकारुन तसेच ठराविक रक्कम निश्चित करुन परीक्षेचा पेपर पुरविल्याची बाब पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झाली आहे. बीड येथील सदर गुन्ह्यातील फरार आरोपी जीवन सानप याचा भाऊ संजय सानप यास तपास पथकाने अटक केल्यानंतर मागील दोन महिन्यांपासून गोपीचंद सानप हा पसार होता.
दरम्यान, तो बुलढाणा येथे येणार असल्याची माहिती तपास पथकास मिळाल्यानंतर सापळा रचून पोलिसांनी त्यास जेरबंद केले आहे. बीड येथे परीक्षेचे पेपर फोडणाऱ्या टोळीत जीवन सानप आणि गोपीचंद सानप हे दोन प्रमुख गट कार्यरत होते. पेपरफुटीच्या गुन्ह्यात त्यांची प्रमुख भूमिका असल्याने पोलीस त्यांचा कसून शोध घेत होते. गोपीचंद सानप याला शनिवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. याबाबत पुढील तपास सायबर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर करत आहे.