गडचिरोली – गडचिरोलीत पोलीस दलाने मोठी कारवाई करत घातपाताचा कट उधळून लावाला आहे. नक्षल्यांनी पुरुन ठेवलेले स्फोटक साहित्य हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. उपविभाग कुरखेडा अंतर्गत पोस्टे पुराडा हद्दीमध्ये मौजा जामटोला, बंजारी रिठ जंगल परिसरात ही घटना घडली आहे.
कोरची दलम- टिपागड एलओएस व कंपनी क्र. 04 च्या नक्षलवाद्यांनी पोलिसांना लक्ष्य करण्यासाठी जिवंत कुकर बॉम्ब पुरून ठेवले होते. जिवंत कुकर बॉम्ब बीडीडीएस पथकाच्या मदतीने यशस्वीरित्या जागेवरच नष्ट करण्यात आले. सध्या जिल्हाभरात नक्षलविरोधी अभियान करण्यात तीव्र करण्यात आले आहे.
गडचिरोली जिल्ह्यामध्ये पुढील तीन महिने नक्षली पोलिसांवर सर्वाधिक हल्ल्याच्या योजना आखतात. नक्षल घातपाती हिंसक कारवाया करण्यासाठी विविध प्रकारच्या शस्त्र व स्फोटक साहित्याचा वापर करतात. हे साहित्य ते मोठया प्रमाणात खरेदी करुन ठेवतात व जंगल परिसरातील जमिनीत गोपनियरित्या पुरुन ठेवतात. तसेच काही ठिकाणी रस्ते तसेच सुरक्षा दलांना धोका होऊ शकेल अशा इतर ठिकाणी स्फोटके, शस्त्र साहित्य व दारुगोळा इत्यादी ते गोपनियरित्या जमिनीत पुरुन ठेवतात.
या जप्तीत जिवंत कुकर बॉम्ब 1 नग, कुकर 4 नग, जिवंत डेटोनेटर 1 नग, जिलेटीन (जेली) 4 नग, स्प्रिन्टर लोखंडी तुकडे 6 नग, गन पावडर 45 ग्रॅम, मोबाईल चार्जर स्विच 1 नग, तुटलेला मोबाईल चार्जर 1 नग, नक्षल शर्ट 1, नक्षल पॅन्ट 1 नग व नक्षल पुस्तके आदी ताब्यात घेण्यात आले. या घटनेनंतर जिल्हाभरात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले आहे.