न्हावरे(प्रतिनिधी) : चिंचणी (ता.शिरूर) येथील घोड धरण ९५ टक्के भरल्याने धरणाचे चार दरवाजे दोन फुटांनी उघडण्यात आले.धरणातून खालील नदीपात्रात दोन हजार २६० क्यूसेकने पाणी सोडण्यात येत आहे.यामुळे लाभक्षेत्रातील शेतकरी वर्ग सुखावला आहे.
घोड धरणाची क्षमता ७ हजार ६३८ दशलक्ष घनफुट आहे. धरणाच्या पाण्यामुळे शिरूर-श्रीगोंदा तालुक्यातील सुमारे वीस हजार हेक्टर शेती ओलीताखाली येते.त्याचप्रमाणे शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती पंचतारांकित औद्योगिक वसाहतीसह पंधरा गावांना तसेच श्रीगोंदा शहर व तालुक्यातील दहा गावांना याच जलाशयातुन पाणी पुरवठा होता. मागील पंधरा-वीस दिवसापासून कुकडी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात जोरदार पाऊस होत आहे.
कुकडी प्रकल्पातुन नदीपात्रात सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे मागील आठ दिवसांपासून घोडमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. शनिवार (दि. २९) पासुन डिंभा धरणातून दोन हजार क्यूसेकने पाणी सोडण्यात आल्याने घोड धरणात ९५ टक्के पाणी साठा झाला आहे. त्यामुळे धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. ज्याप्रमाणे डिंभा धरणातून अधिकचे पाणी येईल त्याप्रमाणे घोड जलाशयातील पाणी पातळी संतुलित ठेवण्यासाठी नदीपात्रात पाणी सोडण्यात येईल. अशी माहिती घोडचे शाखा अभियंता किरण तळपे यांनी दिली.