- प्राथमिक चर्चा पूर्ण; अभ्यासाअंती सप्टेंबरमध्ये निर्णय
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामध्ये भोसरी रुग्णालय व यशवंतराव चव्हाण स्मृती ( वायसीएम) रुग्णालय हे कोविड समर्पित करण्यात आले आहेत. वायसीएम रुग्णालयामध्ये इतर आजारांच्या रुग्णांवर उपचार होत नसल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. मात्र आता शहरामध्ये जम्बो रुग्णालय तसेच कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. त्यामुळे महापालिका पुढील महिन्यात वायसीएम रुग्णालयाचे नॉन कोविड रुग्णालय करण्याच्या तयारीला लागल्याचे स्पष्ट झाले आहे.
पिंपरी चिंचवड शहरामध्ये मार्च महिन्यामध्ये करोनाचे रुग्ण आढळले. त्यानंतर मार्च महिन्यापासून शहरातील रुग्णसंख्या हळूहळू वाढू लागली. शहरातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत महापालिकेने वायसीएम रुग्णालय कोविड समर्पित केले. तर वायसीएममध्ये येणाऱ्या बाकी आजारावरील रुग्णांना डी. वाय. पाटील रुग्णालयाचा पर्याय देण्यात आला. त्यानंतर जून महिन्यामध्ये रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली. त्यामुळे शहरातील कोविड समर्पित रुग्णालयामध्ये बेडची संख्या अपुरी पडू लागली. रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी महापालिकेच्या वतीने शहरामध्ये कोविड केअर सेंटर उभारण्यात आले. याठिकाणी लक्षणे नसलेल्या रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. तर वायसीएममध्ये बाधित मात्र लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
वायसीएम रुग्णालयामध्ये सातशे बेडची व्यवस्था आहे. याठिकाणी विविध आजारांवर उपचार केले जातात. वायसीएम रुग्णालयामध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण उपचारासाठी येतात. शहरातील सर्वात मोठे रुग्णालय असल्याने याठिकाणी प्रसुतीसाठी विविध जिल्ह्यातून महिलांना आणले जाते. तसेच विविध लसीकरणाची सोय दर महिन्याला केली जाते. रुग्णालय कोविड समर्पित केल्याने याठिकाणी येणाऱ्या शहरातील इतर आजारांच्या रुग्णांसोबतच आजूबाजूच्या रुग्णांचीही मोठी गैरसोय झाली आहे.
शहरामध्ये करोनाबाधित रुग्णांसाठी जम्बो रुग्णालय व कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहेत. सप्टेंबर महिन्यामध्ये या रुग्णालयामध्ये वायसीएम रुग्णालयातील करोनाबाधित रुग्ण हलविण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. तसेच शहरातील इतर आजारांच्या रुग्णांसाठी वायसीएम पुन्हा पूर्ववत करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
सप्टेंबर महिन्यामध्ये शहरातील रुग्णांचा अंदाज घेण्यात येईल. त्यावेळी शहरातील परिस्थिती कशी आहे. रुग्णांना शिफ्ट केले तर चालेल का याचा अभ्यास करण्यात येईल. प्राथमिक चर्चा झाली आहे. एकंदरितच परिस्थितीचा आढावा घेऊन वायसीएम रुग्णालयाला पुन्हा नॉन कोविडमध्ये बदलण्याचा निर्णय घेण्याचे नियोजन आहे.
– संतोष पाटील, अतिरिक्त आयुक्त