Team India Head Coach & Ricky Ponting :- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी माझ्याशी संपर्क साधला होता. मी ही ऑफर स्विकारावी अशी माझ्या मुलाचीही इच्छा होती. परंतू, सध्याच्या जिवनशैलीत 10 ते 11 महिने व्यस्त असणाऱ्या संघाच्या प्रशिक्षकपदाची आॅफर घेणे मला न झेपणारे असल्याने मी ही जबाबदारी नाकारली, असा खुलासा ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि सध्या दिल्ली कॅपिटल्सचा प्रशिक्षक असणाऱ्या रिकी पॉन्टिंगने केला आहे.
आयसीसीच्या चॅनलशी संवाद साधताना पॉन्टिंग म्हणाला की, मला राष्ट्रीय संघाचा प्रशिक्षक व्हायला नक्कीच आवडेल, पण जर तुम्ही भारतीय संघासोबत काम केले तर तुम्ही आयपीएल संघात सहभागी होऊ शकत नाही. मी दिल्ली कॅपिटल्सशी संबंधित आहे. याशिवाय मुख्य प्रशिक्षकाचे काम वर्षातील 10 किंवा 11 महिने असते. ते सध्या माझ्या जीवनशैलीत बसत नाही. माझे कुटुंब आणि माझ्या मुलांनी गेले पाच आठवडे माझ्यासोबत आयपीएलमध्ये घालवले आहेत आणि ते दरवर्षी येतात. आम्हाला पुढील काही वर्षांसाठी भारत भेट द्यायला आवडेल. आम्हाला भारतात आणि तिथल्या संस्कृतीत राहायला आवडते. पण मला माझा वेळ माझ्या कुटुंबाला द्यायचा आहे, असेही त्याने पुढे स्पष्ट केले.
पाँटिंगकडे असणाऱ्या जबाबदाऱ्या
पॉन्टिंग सध्या आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे आणि इतर अनेक टी-20 लीगशीही संबंधित आहे. तो ऑस्ट्रेलियन टी-20 लीगमधील होबार्ट हरिकेन्ससाठी रणनीती प्रमुख देखील आहे. अमेरिकन क्रिकेट लीगमधील वॉशिंग्टन फ्रीडम संघाचाही तो मुख्य प्रशिक्षक आहे.