कोल्हापूर :– महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) व कोल्हापूर जिल्हा टेनिस संघटना (केडीएलटीए) यांच्या वतीने आयोजित व डी.वाय. पाटील पुरस्कृत 19व्या रमेश देसाई मेमोरियल 16 वर्षाखालील राष्ट्रीय ज्युनियर टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत उप-उपांत्यपूर्व फेरीत मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या स्वानिका रॉय हिने सातव्या मानांकित पश्चिम बंगालच्या आकांशा घोषचा 6-1, 6-0 असा पराभव करून सनसनाटी निकाल नोंदवला.
कोल्हापूर येथील केडीएलटीए टेनिस कॉम्प्लेक्स येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात चुरशीच्या लढतीत सहाव्या मानांकित हरियाणाच्या स्वस्ति सिंगने तेलंगणाच्या नवव्या मानांकित प्रिंसी मांडगल्लाचा टायब्रेकमध्ये 6-7(4), 6-1, 6-1 असा पराभव केला. पाचव्या मानांकित महाराष्ट्राच्या नैनिका बेंद्रमने आपली राज्य सहकारी देवश्री महाडेश्वरचे आव्हान 6-4, 6-3 असे संपुष्टात आणले. दहाव्या मानांकित महाराष्ट्राच्या पार्थसारथी मुंढेने काल मानांकित खेळाडूवर विजय मिळवणाऱ्या श्रेया पठारेचा 6-2, 6-1 असा सहज पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली.
राष्ट्रीय ज्युनियर टेनिस अजिंक्यपद स्पर्धा : नऊ मानांकित खेळाडूंचे आव्हान संपुष्टात…
मुलांच्या गटात अव्वल मानांकित हरियाणाच्या प्रतीक शेरॉनने महाराष्ट्राच्या आराध्य म्हसदेचा 6-4, 6-7(3), 6-3 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव केला. महाराष्ट्राच्या नील केळकरने कडवी झुंज देत स्वराज ढमढेरेवर 6-3, 0-6, 7-6(2) असा विजय मिळवला. महाराष्ट्राच्या सक्षम भन्साळीने कर्नाटकाच्या शरण सोमसीला 5-7, 6-0, 6-2 असे पराभूत केले. महाराष्ट्राच्या शिवतेज शिरफुलेने क्वालिफायर वरद उंद्रेला 6-3, 6-1 असे नमविले.