जिवास्किला(फिनलंड) – भारताचा धावपटू तेजस शिरसेने बुधवारी जागतिक अँथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूर चॅलेंजर मोटोनेट जीपी मालिकेत 13.41 सेकंद वेळेसह सुवर्णपदक जिंकून पुरुषांच्या 110 मीटर अडथळा शर्यतीत राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला. 21 वर्षीय शिरसेने 2017 मध्ये सिद्धांत थिंगल्यने नोंदविलेल्या 13.48 सेकंदांच्या वेळेला आता पाठ दाखवली आहे. त्याने 9 मे रोजी नेदरलँड्समध्ये 13.56 सेकंदांची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली होती.
शिरसेने कोणतेही आंतरराष्ट्रीय पदक जिंकलेले नाही, परंतु पुरुषांच्या 110 मीटर अडथळा शर्यतीत तो अव्वल भारतीय आहे. त्याने गेल्या वर्षी फेडरेशन कप, राष्ट्रीय आंतरराज्य चॅम्पियनशिप आणि नॅशनल ओपनमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. परदेशात प्रशिक्षण आणि स्पर्धा करत असल्याने त्याने यंदाच्या फेडरेशन कपमध्ये भाग घेतलेला नाही.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या 110 मीटर अडथळा शर्यतीसाठी स्वयंचलित पात्रता गुण 13.27 सेकंद आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या 110 मीटर अडथळा शर्यतीत 40 खेळाडू भाग घेतील. यातील निम्मे जागतिक क्रमवारीत स्थान मिळवतील.
ज्योतीकडून विक्रमाची बरोबरी
महिलांच्या 100 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत, ज्योती यारराजीने तिच्या स्वतःच्या 12.78 सेकंदांच्या राष्ट्रीय विक्रमाशी बरोबरी साधली. परंतू, ज्यामुळे तिला पॅरिस ऑलिंपिकसाठीची स्वयंचलित पात्रता सेकंदाच्या शंभरावा भागाने गमावावी लागली आहे.