13 पैकी 11 तालुक्यांमध्ये शंभर टक्क्यांपेक्षा अधिक पावसाची नोंद
पुणे – जिल्ह्यातील ग्रामीण भागात जून महिन्याच्या तिसऱ्याच आठवड्यात सरासरीच्या 94 टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे यंदा जूनमधील एकूण सरासरी पाऊस शंभर टक्क्यांपुढे जाईल, अशी अपेक्षा आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील 13 पैकी 11 तालुक्यांमध्ये शंभर टक्क्यांपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. यात मावळ तालुक्यात सर्वाधिक 144 टक्के पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यातील ग्रामीणमध्ये जूनमध्ये सरासरी 176 मिमी पाऊस पडतो. त्यामध्ये वेल्हे तालुक्यात 400 मिमीपेक्षा अधिक तर भोर, मुळशी, वेल्हे, मावळ या तालुक्यांमध्ये 200 मिमीपेक्षा अधिक पाऊस पडतो. त्यानुसार दि.1 ते 21 जूनदरम्यान जिल्ह्यात 166 मिमी म्हणजेच 94 टक्के पाऊस झाला आहे. त्यामध्ये 12 दिवस चांगला पाऊस झाला असून, दि. 5 ते 7 आणि 17 ते 20 जूनदरम्यान सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.
सध्या ग्रामीणमध्ये पावसाचा जोर वाढलेला असून, मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, जुन्नर, आंबेगाव या पर्जन्यमान्य असलेल्या तालुक्यांमध्ये पाऊस पडत आहे. तर, अन्य तालुक्यातही पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत.
दरम्यान, मागील वर्षीच्या पावसाळ्यात पुणे जिल्ह्यात 1 हजार 20 मिमी म्हणजेच सरासरीच्या 123 टक्के पाऊस झाला आहे. यंदाही पाऊस समाधानकारक राहण्याची शक्यता असून, मे अखेरीपासून पूर्व मोसमी पावसाने जोरदार सुरुवात केली आहे. जूनमध्येही पावसाचा जोर कमी-अधिक होता. जुलैमध्येही असाच पाऊस राहिला, तर धरणेही लवकर भरण्याची अपेक्षा आहे.