मुंबई – शिक्षक, पदवीधरच्या निवडणुकांसाठी ठाकरे गटाने कंबर कसली असून उमेदवारांच्या नावांची चाचपणी सुरु झाली आहे. ठाकरे गटाकडून मुंबई आणि कोकण पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवार लवकरच जाहीर होणार आहेत.
मुंबई पदवीधर मतदारसंघात अनिल परब, वरून सरदेसाई यांच्या नावाचा विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच, मुंबई शिक्षक मतदार संघात ज. मो. अभ्यंकर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात किशोर जैन यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मुंबई पदवीधर मतदारसंघांमध्ये विलास पोतनीस हे आमदार म्हणून कार्यरत आहेत. मात्र आता त्यांच्याऐवजी विधान परिषदेचे आमदार अनिल परब यांना मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवार म्हणून उतरवले जाऊ शकते.
अनिल परब यांचा 27 जुलै रोजी विधान परिषदेच्या आमदारकीचा कार्यकाळ पूर्ण होत आहे.
मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी अनिल परब यांचं नाव उमेदवारीसाठी अधिक चर्चेत आहे. त्यासोबतच ठाकरे गटाचे युवा नेते सचिव वरून सरदेसाई यांचासुद्धा विचार मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी केला जात आहे. तर मुंबई शिक्षक मतदार संघासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांचे नाव जवळपास निश्चित मानला जात आहे.
कोकण पदवीधर मतदारसंघातून रायगडचे सह संपर्कप्रमुख आणि अनंत गीते यांचे विश्वासू किशोर जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर नाशिक शिक्षक मतदार संघात सध्या आमदार असलेले किशोर दराडे हे जरी शिवसेना ठाकरे गटात सोबत असले तरी शिवसेना ठाकरे गटाकडून अन्य नावांचीही चाचपणी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, विधान परिषदेच्या 4 जागांसाठीच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. या चार जागांमध्ये दोन शिक्षक तर दोन पदवीधर मतदार संघाचा समावेश आहे. मुंबई आणि कोकण पदवीधर मतदार संघ, तर नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदार संघात ही निवडणूक होणार आहे. या चारही जागांची मुदत 7 जुलै 2024 ला संपत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 22 मे आहे तर, मतदानाची तारीख 10 जून आहे. 13 जूनला मतमोजणी होईल.