मुंबई: जिल्हा निर्मिती ही एक मोठी आर्थिक व प्रशासकीय प्रक्रिया असून अत्यंत क्लिष्ट व खर्चिक बाब आहे. त्यामुळे विविध पैलू तपासून धोरण निश्चित झाल्यानंतर नवीन जिल्हा निर्मितीसंदर्भात निर्णय घेण्यात येईल, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत सांगितले.
सदस्य डॉ. वजाहत मिर्झा यांनी पुसद जिल्ह्याची निर्मिती करण्याविषयीची लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या लक्षवेधीला उत्तर देताना थोरात बोलत होते. विदर्भात यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्याची पुसद जिल्ह्यामध्ये निर्मिती व्हावी यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांची निवेदने विविध माध्यमातून प्राप्त झाली आहेत. राज्यातील अस्तित्वात असलेल्या जिल्ह्यांचे विभाजन/पुनर्रचना करण्यासाठी राज्यस्तरावर निकष ठरवून शासनास शिफारशी करण्यासाठी अपर मुख्य सचिव महसूल यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्ती करण्यात आली होती. या समितीचा अहवाल शासनास प्राप्त झाला आहे. जिल्हा विभाजनाचे निकष निश्चित करण्याविषयी मंत्रिमंडळाच्या मान्यतेने धोरण ठरवून नवीन जिल्हा निर्मितीचा निर्णय घेण्यात येईल, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानपरिषदेत सांगितले.
लक्षवेधीवरील चर्चेत सदस्य सर्वश्री निलय नाईक, महादेव जानकर, विनायक मेटे यांनी सहभाग घेतला.