प्रभात प्रभाव
केंदूर-येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी वेळेत उपस्थित रहात नसल्याने गर्भवती महिलांना उपचारापासून वंचित राहावे लागत असल्याने प्रभातने ‘केंदूरचे आरोग्य केंद्र काय कामाचे’ अशा आशयाचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर जिल्हा परिषद आरोग्य विभाग खडबडून जागा झाला.
तात्काळ स्थानिक जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीत बगाटे यांनी केंदूर आरोग्य केंद्र प्रशासनाला यापुढे नागरिकांच्या तक्रारी येणार नाहीत, केंद्रात अधिकारी आणि कर्मचारी वेळेत हजर राहतील, दैनंदिन काम सुरळीत होईल आणि अधिकारी, कर्मचारी कामात हलगर्जीपणा करणार नाही या सूचना दिल्या.
- जिल्हा परिषद सदस्यांचा पुढाकार
प्रभातने दखल घेऊन वृत्त प्रसारित केल्यानंतर जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे अतिरिक्त आरोग्य जिल्हा अधिकारी एस. एन. थोरात, तालुका आरोग्य अधिकारी आर. डी. शिंदे त्याचबरोबर तालुका विस्तार अधिकारी आव्हाड, केंदूर आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी मायादेवी पवार, सारिका तायवाडे यांच्या सोबत सविता बागाटे यांच्या प्रमुख उपस्थिती बैठक घेऊन यापुढे आरोग्य केंद्रातील अधिकारी आणि कर्मचारी वेळेत उपस्थित राहतील आणि दैनंदिन कामकाज सुरळीत होणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे यांनी दैनिक प्रभातशी बोलताना सांगितले.