Ghatkopar hoarding collapse – घाटकोपर येथे 13 मे रोजी मोठी होर्डींग कोसळून झालेल्या दुर्घटनेत आज आणखी एका जखमीचा मृत्यू झाला आहे. यामुळे सदर दुर्घटनेतील मृतांची संख्या 1७ वर पोहोचली आहे. या होर्डींग दुर्घनेत जखमी झालेल्यांपैकी 10 जण आजही विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.
राजू सोनावणे असे मृत जखमीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, घाटकोपर (पूर्व), छेडानगर येथे एका पेट्रोल पंपावर अचानकपणे होर्डिग कोसळले होते. त्यावेळी दुर्घटनेत प्रथमतः 14 जणांचा बळी गेला होता. नंतर आणखीन दोघांचा बळी गेला. एकूण 16 जणांचा बळी गेला.
तर, 81 जण जखमी अवस्थेत राजावाडी, सायन, के.ई.एम., हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर , एम.जे.फुले, प्रकृती रुग्णालय या रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र यशस्वी उपचारानंतर राजावाडीमधील 58 जणांना, के.ई.एम.मधील 4 जणांना, हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअरमधील 3 जणांना,
एम.जे.फुलेमधील 4 जणांना आणि प्रकृती रुग्णालयातील 1 जण अशा 70 जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देऊन घरी पाठविण्यात आले. तर, राजावाडी रुग्णालयात 15 गंभीर जखमींचा, के.ई.एम.मध्ये 1 जण आणि सायन रुग्णालयात 1 जण अशा एकूण 17 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच, राजावाडी रुग्णालयात आजही आणखी 8 जणांवर तर के.ई.एम. रुग्णालयात 2 जणांवर अशा एकूण 10 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत.