हॉटेल, रेस्टोचा निर्णय पुणे-पिंपरीतील एकत्रितच

पुणे – राज्यशासनाने निवासी हॉटेल्स आणि लॉज सुरू करण्यास सशर्त परवानगी दिली असली, तरी पुण्यात अजून त्याबाबत निर्णय झालेला नाही. मात्र, हा निर्णय घेताना दोन्ही महापालिका आयुक्‍त संयुक्‍त बैठक घेऊन पुढील निर्णय घेणार आहेत.

शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत होणाऱ्या आढावा बैठकीनंतर ही बैठक घेतली जाणार असल्याचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी स्पष्ट केले. दोन्ही शहरांत करोनाचे रुग्णसंख्या वाढत आहेत, तसेच दोन्ही शहरांच्या हद्दी जवळ असल्याने दोन्ही शहरांत वर्दळ वाढली आहे. ही बाब लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात येणार असल्याचे आयुक्त गायकवाड यांनी स्पष्ट केले. राज्यात मुंबई पाठोपाठ पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात हॉटेल व्यवसाय क्षेत्र आहे.

लॉकडाऊनमुळे या क्षेत्रावर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे “अनलॉक’ सुरू होताना, शासनाने बुधवारपासून राज्यातील निवासी हॉटेल तसेच लॉज सर्शत परवानगी दिली आहेत. मात्र, वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने अजून याबाबत निर्णय घेतलेला नाही. तर पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही हॉटेल तसेच लॉजबाबत निर्णय घेतलेला नाही. त्यातच, मागील आठवड्यात पालकमंत्री अजित पवार यांनी या दोन्ही शहरांत करोना नियंत्रणात येत नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे आणखी शिथिलता दिल्यास रुग्ण वाढणारच आहेत. त्यामुळे आता शिथिलता देताना विशेष खबरदारी घेतली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून पालिकेने अजून हॉटेल तसेच लॉजबाबत निर्णय घेतलेला नाही.

हद्दीमुळे संयुक्‍त निर्णय?
दोन्ही महापालिका आयुक्‍तांचे हॉटेलसाठी स्वतंत्र आदेश असले, तरी त्यासाठीचे नियम, वेळा, उपाययोजनांमध्ये समानता असेल. एकाच बाबींसाठी दोन्ही हद्दीत वेगवेगळे निर्णय नकोत, म्हणून संयुक्‍त बैठक घेऊन निर्णय घेण्यात येण्याची शक्‍यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.