शिक्रापूर -सणसवाडी येथे 24 मार्च 2020 रोजी शिरूर तालुक्यातील सर्व प्रथम रुग्ण आढळून आल्यानंतर प्रशासनाला गावामध्ये करोनाचा शिरकाव टाळण्यासाठी यश आलेले होते. मात्रा, आता चार महिन्यांनी पुन्हा सणसवाडीमध्ये करोनाचा शिरकाव झाला असून दोघा स्थानिकांना करोनाची बाधा झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
शिरूर तालुक्यात अनेक ठिकाणी करोना बाधित रुग्ण आढळून येत असताना वारंवार पुणे येथे ये-जा करत असलेल्या सणसवाडी येथील एका स्थानिक युवकाला सर्दी, खोकल्याचा त्रास होऊ लागल्याने त्याने खबरदारी म्हणून स्वतः तपासणी केली असताना त्याचा करोना अहवाल मंगळवारी (दि. 7) पॉझिटिव्ह आला. तर त्याच्या सोबत नेहमी राहणाऱ्या त्याच्या नात्यातील एकाने तपासणी केली असता त्याचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे.
दोघांना करोनाची लागण झाल्याने त्यांच्या संपर्कातील दहा जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले असून या दोघांच्या संपर्कात आलेल्या अन्य व्यक्तींची माहिती घेण्याचे काम आरोग्य विभागाकडून हाती घेण्यात आले असून ग्रामपंचायतच्या वतीने करोनाबाधित रुग्ण आढळून आलेल्या ठिकाणची परिसर फवारणी करण्यात आला आहे.