कॉंग्रेसने कर्नाटकमध्ये जेडीएसशी हातमिळवणी करायला नको होती; सिद्धरामय्या यांची परखड भूमिका

 

बंगळूर-कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी मांडलेल्या परखड भूमिकेमुळे त्या पक्षाचा जेडीएसबरोबराचा दुरावा आणखी वाढल्याचे स्पष्ट होत आहे. मागील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसने कर्नाटकमध्ये जेडीएसशी हातमिळवणी करायला नको होती. दोन्ही पक्षांच्या आघाडीमुळे कॉंग्रेसला सात ते आठ जागांचा फटका बसला, असे सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीत कर्नाटकमध्ये कॉंग्रेसला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. त्या निवडणुकीनंतर कॉंग्रेस आणि माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील जेडीएसमध्ये बंडखोरी झाली. त्यामुळे त्या पक्षांचे कर्नाटकमधील आघाडी सरकार कोसळले आणि भाजपच्या सत्तेचा मार्ग मोकळा झाला. त्या घडामोडींचा आधार घेऊन कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडूराव यांनी नुकतेच महत्वाचे भाष्य केले. जनतेला आघाडी रूचली नाही. त्यामुळे कॉंग्रेसला अपेक्षित निकाल लागला नाही, असे त्यांनी म्हटले. त्यावर सिद्धरामय्या यांनी प्रतिक्रिया दिली. कॉंग्रेस आणि जेडीएस अनेक वर्षे एकमेकांविरोधात लढले. त्यामुळे दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन आघाडी करण्याची गरज नव्हती. दोन्ही पक्षांची मते एकमेकांना मिळत नाहीत. जेडीएसशी हातमिळवणी केली नसती तर कॉंग्रेसने लोकसभेच्या सात ते आठ जागा जिंकल्या असत्या, असे सिद्धरामय्या पत्रकारांशी बोलताना म्हणाले. कॉंग्रेसने स्वबळावर लढावे अशी भूमिका मी लोकसभा निवडणुकीआधी मांडली होती. मात्र, मी एकट्यानेच ती भूमिका घेतल्याने कॉंग्रेस श्रेष्ठींनी त्याकडे लक्ष दिले नाही, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.