विश्रांतवाडी -शिवराज्याभिषेक सोहळ्याला 350वे वर्ष सुरू होत आहे. हा दिन जगभर पोहोचेल आणि विश्ववंदनीय होईल यासाठी सर्वांनी योगदान द्यावे. रायगड किल्ल्यास गतवैभव प्राप्त व्हावे यासाठी रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून युद्धपातळीवर काम सुरू आहे, असे अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे प्रमुख मार्गदर्शक संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.
6 जून 2023 ते 6 जून 2024 असे शिवराज्याभिषेकाचे वर्ष विविध लोकोपयोगी व ऐतिहासिक उपक्रमांनी साजरे केले जाणार आहे. यासाठीच्या व्यापक नियोजनासाठी पुणे येथे महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी व शिवभक्तांच्या उदंड उत्साहात बैठक घेण्यात आली. यावेळी संभाजी छत्रपती बोलत होते.
यावेळी शिवराज्याभिषेक महोत्सवाच्या प्रमुख मार्गदर्शिका आदरणीय युवराज्ञी संयोगीताराजे छत्रपती यांनीही सर्व महोत्सव व्यवस्थापन कमिटीच्या प्रमुखांकडून कामाचा आढावा घेतला. शिवभक्तांना शिवराज्याभिषेक महोत्सवात कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले. युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.
समितीचे सदस्य अतुल चव्हाण यांनी स्वागत केले तर प्रास्ताविक अध्यक्ष फत्तेसिंह सावंत यांनी तसेच कार्याध्यक्ष हेमंत साळोखे यांनी आभार मानले.
चंदुकाका सराफ यांचेही योगदान…
चंदुकाका सराफ यांनी 350 व्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधुन खास सोन्याचे 350 सुवर्ण होण तयार केले असुन त्यांचा अभिषेक शिवमुर्तीवर करण्यात येणार आहे. याबद्दल चंदुकाका सराफ पेढीचे आभार युवराज संभाजी छत्रपती महाराज यांनी मानले.