पारनेर – उन्हाची चाहूल लागताच बाजारपेठेत मातीचे माठ दाखल होतात. हे दर वर्षीचे चित्र असले तरी गेल्या दोन वर्षातील करोनाच्या प्रादुर्भावामुळे हे प्रमाण कमी झाले होते. यंदा करोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला आहे. त्यामुळे गरिबांचा फ्रीजचा व्यवसाय पुन्हा सुरु झाला आहे. मातीचे माठ हे 100 रुपयापासून ते 500 रुपयापर्यंत बाजारपेठेत उपलब्ध आहेत. रंगे बेरंगी माठ असलेल्या बाजारपेठेत माठ उपलब्ध आहेत. माठामध्ये बदल करून त्यास तोटी, झाकण असलेली वेगळे माठ ग्राहकांना आकर्षित करतील, असे माठ उपलब्ध आहेत.
पारनेर शहर व परिसरात बहुतांश ठिकाणी आरओ प्रकल्प व थंड पाण्याचे जार सहज व कमी किंमतीत उपलब्ध होत असल्याने ग्रामीण भागातील गरिबांचा फ्रीज असलेला विविध आकारात असलेले माठ हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे असे प्रथमदर्शनी निदर्शनास येत आहे.परिणामी पारंपरिक कुंभार समाज करीत असलेल्या या व्यवसायातील व्यवसायिक बेरोजगारीच्या उंबरठयावर असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
पारा चाळिशी पार गेला आहे. शेतात किंवा प्रवासात पाण्यासाठी जार सोयीचा आहे. त्यामुळे गरिबांचा फ्रीज असलेला माठ हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. गावोगावी आरओ फिल्टरचे प्रकल्प सुरु झाले आहे. त्यामुळे शुध्द व थंड पाणी काही ठिकाणी मोफत तर काही ठिकाणी अवघ्या पाच रुपयात मिळू लागले आहेत. त्यामुळे माठाचा व्यवसाय कमी झाला आहे. उन्हाळ्यात 500 ते 600 माठ विक्री होणारे अवघे 200 पर्यंत विक्री होत आहेत.