नगर -कोणताही आजार असेल, तर पहिली धाव डॉक्टरांकडे असते. डॉक्टर हा समाजाचा कणा आहे. आज संपूर्ण जगावर करोनाचे सावट आहे. हे संकट वाढेल किंवा थांबेल, याची अजुनही शाश्वती नाही. परंतु त्याला प्रतिबंध करण्यासाठीची महत्त्वाची भूमिका डॉक्टर्स व करोनायोद्धे बजावत आहेत, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी केले.
एशियन नोबल हॉस्पिटल, रोटरी मिडटाऊन व इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्यातर्फे डॉक्टर-डे निमित्त आयोजित रक्तदान शिबिराचे उदघाटन करताना ते बोलत होते. “नोबल’चे संचालक डॉ. बापूसाहेब कांडेकर, विजय निकम, आयएमएचे उपाध्यक्ष डॉ. नरेंद्र वानखेडे, डॉ. सागर झावरे, सचिव डॉ. सचिन वहाडणे, क्लबचे अध्यक्ष क्षितीज झावरे, सचिव दिगंबर रोकडे, राहुल हिरे, विजय इंगळे, सतीश शिंगटे, हेमंत कराळे, तरनजित नारंग, जालिंदर शिंदे, प्रशांत अमरापूरकर, ओंकार कुलकर्णी, अभय राजे आदी यावेळी उपस्थित होते.
“नोबल’चे संचालक डॉ. कांडेकर म्हणाले, “”करोनामुळे रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे रक्तदान करून आपण रुग्णांना जीवनदान देण्याचे काम केले पाहिजे. गेल्या तीन महिन्यांपासून आपण सर्वजण सरकारच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहोत. आपण त्यांना साथ दिली पाहिजे. त्यांनी दिलेल्या मार्गदर्शन तत्त्वानुसार सहकार्य करून करोनावर मात करू शकतो.”
रोटरी मिडटाऊनचे सचिव दिगंबर रोकडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कोविड 19मध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांचा प्रशस्तिपत्र देऊन आयुक्तांच्या हस्ते यावेळी सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन विजय निकम यांनी केले. आयएमएचे सचिव डॉ. सचिन वहाडणे यांनी आभार मानले.