राज्य सरकारची मान्यता; स्टेशनच्या पाचशे मीटर क्षेत्रात चार एफएसआय
पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गावर टीओडी झोन लागू करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे या मेट्रो मार्गावरील स्टेशनच्या पाचशे मीटरच्या परिसरात चार एफएसआय वापरून बांधकाम करण्यास परवानगी मिळणार आहे.
पीएमआरडीएने हिंजवडी ते शिवाजीनगर असा 23 किलोमीटर लांबीचा मेट्रो प्रकल्प हाती घेतला आहे. या मेट्रो मार्गाला राज्य आणि केंद्र सरकारने यापूर्वीच मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प बीओटी तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. हा संपूर्ण मार्ग इलिव्हेटेड असणार आहे.
पीएमआरडीएने हिंजवडी ते शिवाजीनगर या दरम्यानच्या मेट्रो मार्गावर स्टेशनच्या पाचशे मीटरच्या परिसरात टीओडी झोन वापरण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती राज्य सरकारला केली होती. परंतु, राज्य सरकारच्या पातळीवर हा प्रस्ताव प्रलंबित होता. आता यावर निर्णय झाला आहे. राज्य सरकारच्या नगरविकास खात्याने त्यास मान्यता दिली. याबाबतचे आदेश नगरविकास खात्याचे अवर सचिव किशोर गोखले यांनी काढले आहेत. त्यामुळे पीएमआरडीएने प्रस्तावित केलेल्या मेट्रो मार्गावरील स्टेशनच्या पाचशे मीटरच्या परिसरात चार एफएसआय वापरून बांधकाम करणे शक्य होणार आहे.
हिंजवडी ते शिवाजीनगर ही मेट्रो शिवाजीनगर येथे महामेट्रोला जोडली जाणार आहे. या मार्गावर एकूण 23 मेट्रो स्टेशन असणार आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही हद्दीच्या शहरातून ही मेट्रो जाते. या मेट्रो मार्गावरील स्टेशनच्या परिसरात ही टीओडी झोन लागू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिल्यामुळे आता हिंजवडी, बाणेर, बालेवाडी, वाकड, माण आणि शिवाजीनगर या भागातून जाणाऱ्या मेट्रो स्टेशनच्या परिसरात चार एफएसआय वापरून बांधकाम करता येणार आहे.