अनधिकृत नळजोड, पाणी खेचणाऱ्यांचे कनेक्‍शन तोडले

पुणे – पाण्याची भेडसावणारी समस्या लक्षात घेता महापालिकेने पुन्हा एकदा अनधिकृत नळजोडांवरील कारवाई कडकपणे करण्याला सुरूवात केली आहे. गेल्या दोन दिवसांत शहरभरात सुमारे 70 अनधिकृत नळजोड तोडले आहेत. ही कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार आहे. यामध्ये शहरात विविध ठिकाणी असलेल्या गावठाणाचे भाग, मुंढवा, बिबवेवाडी आणि काही उपनगरच्या परिसराचा समावेश आहे.

शहरात अधिकृत नळजोडांपेक्षा अनधिकृत नळजोडांची संख्या सर्वाधिक आहे. पाणीपट्टी चुकवून बिनधास्त अनधिकृतपणे नळजोड घेऊन सर्रास आणि अक्षरश: चोवीस तास पाणी वापरले जाते. त्यामुळे पाण्याचे समान वाटप होत नाही आणि जो नियमित कर भरतो आणि त्यामुळे ज्याला पाणी मिळण्याचा हक्क आहे, तो यापासून वंचित राहतो. अनधिकृत नळजोड वाढण्यामागे मतांचे राजकारण आहे हे सर्वश्रुतच आहे. परंतु माननीयांमुळेच ही संख्या वाढलेली असताना, त्यांच्याकडूनच महापालिका मुख्यसभेत पाणीकपात, पाणी येत नसल्याबाबत तकरारी केल्या जातात.

तसेच तेच प्रशासनाविरोधात आंदोलन करतात. प्रशासन जेव्हा जागेवर कारवाईला जाते तेव्हा त्यांना अडवण्याचे काम हेच माननीय करत असतात. त्यावेळीही प्रशासनाची अडचण होते. मात्र, यंदा भीषण पाणी टंचाईचे संकेत लक्षात घेता, महापालिकेला अनधिकृत नळजोडांवर कारवाई करणे क्रमप्राप्त आहे. त्यानुसार ही कारवाई करण्याला सुरूवात झाली आहे.

यापुढे थेट मोटारी जप्त करणार

ज्या भागात कमी दाबाने किंवा अपुरा पाणीपुरवठा होतो अशा भागामध्ये गृहप्रकल्पांपासून ते बंगल्यांपर्यंत सर्व वर्गातून इलेक्‍ट्रिक मोटर लावून पाणी खेचून घेतले जाते. त्याचा सर्वात मोठा परिणाम पाणीपुरवठ्यावर होतो. तसेच अशा मोटारी लावणे बेकायदेशीर आहे. मात्र, अशा मोटारींवरही जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.