संडे स्पेशल : रंगोत्सव जीवनाचा…

-अशोक सुतार

हे जग रंगांनी भरलेले आहे, सर्वत्र रंगांचा उत्सव फुलला आहे. रंग नसतील तर मानवाच्या आयुष्यात आनंद नाही. हे जग विविध रंगांनी बनलेले आहे. झाडे, पाने, फुले, पक्षी, प्राणी यांचे रंग विविध आहेत. आकाश हेही विविध रंगांनी भरलेले भासते. सकाळी उठल्यानंतर सूर्योदयापूर्वी पिवळसर, गुलाबी तांबडे आकाशनंतर दिवस सुरू झाल्यानंतर निळेभोर आकाश नजरेस पडते. कधी पावसाळ्यात श्‍यामल वर्णाच्या ढगांनी गच्च भरलेले आकाश उदासवाणे दिसते तर निरभ्र आकाशात पांढरे ढग एखाद्या योग्यासारखे वाटतात.

सायंकाळी हूरहूर लावणारी वेळ येते. सूर्य अस्ताला जाण्याच्या तयारीत असतो. त्यावेळी आकाशात पिवळ्या, केशरी, गुलाबी आणि जांभळे, निळेभोर आभाळ भरून दिसते. हे दृश्‍य रमणीय दिसते. तसेच आयुष्यातील आठवणीही अनेकांना हूरहूर लावतात. सायंकाळी वृद्ध लोकांना त्यांचा संपूर्ण आयुष्यकाळ आठवू लागतो. आकाशातील रंगही तेच संदेश देतात. बालपणाचा, तारुण्याचा, वृद्धत्वाच्या आठवणी मनात रुंजी घालतात. या सर्व आठवणी मनात काहूर माजवतात.

रंगांचे जग एवढ्यापुरतेच मर्यादित नाही तर अनंत रंग या सृष्टीत ठाण मांडून बसलेले दिसतात. हिरव्यागार शिवारात पोपटी, गडद हिरवी, गुलाबी, जांभळट पानेही दृष्टीस पडतात. वृक्षांची खोडेही तांबूस, फिकट जांभळ्या, तपकिरी, किरमिजी अशा अनेक रंगांची तर बहुतेक करड्या रंगाची दिसतात. सृष्टीचे सौंदर्य वाखाणण्याजोगे आहे. निसर्गाने त्यात काही कमतरता राहू दिली नाही. एवढे सर्व जग सुंदर आणि विशाल आहे ते निसर्गामुळेच.

अशा हिरव्यागार समृद्ध वातावरणात मानवाची समाधी लागते. त्यात कधी कोणाला आध्यात्मिक अनुभवास येते तर कधी त्याला जीवन जगण्याची प्रेरणा मिळते. काहीवेळा चैतन्याचे विविध रंग दिसून विवेकाचा नवा प्रकाश समोर येतो. या प्रकाशाच्या वाटा त्याला निश्‍चितच विकासाच्या मार्गावर नेतात. रंग हे जादूगार आहेत. मानवाच्या मनात उद्दिपीत होणारे विविध रंग मनातील भाव-भावना यांचे कारक आहेत.

एक मुलगा नेहमी उदास राहात असे. त्याला चित्र काढण्याची आवड होती. तो चित्रेही छान काढत असे. परंतु त्याच्या उदास असण्याचे कारण समजत नव्हते. त्याचे आई-वडील डॉक्‍टरांकडे गेले. त्यांनी मुलाची समस्या डॉक्‍टरांना सांगितली. डॉक्‍टरांनी त्या मुलाशी बोलण्याचा प्रयत्न केला; पण तो काहीच बोलत नव्हता. मुलाला चित्रांची आवड आहे, हे समजताच त्यांनी त्याने काढलेली चित्रे आणावयास सांगितली.

ती चित्रे पाहताच डॉक्‍टर गंभीर झाले. कारण मुलाने चित्रे छान रेखाटली होती, परंतु त्या चित्रांतील रंगछटा उदासवाण्या रंगांतील होत्या. डॉक्‍टरांनी चित्रांविषयी कौतुक करत मुलाला माहिती विचारली असता, मुलाने आई-वडिलांची भांडणे होत असल्याचे सांगितले. अशाप्रकारे आयुष्यात होणाऱ्या सुख- दु:खांचे प्रतिबिंब मनपटलावर पाहायला मिळते.

प्रत्येक रंगाचे वैशिष्ट्य, स्वभाव वेगळा असतो. प्राथमिक रंग तीन आहेत. तांबडा, निळा आणि पिवळा. तांबडा रंग म्हणजेच लाल रंग हा क्रांतीचे प्रतीक आहे. पिवळा रंग मैत्रीचे प्रतीक तर निळा रंग शांततेचे प्रतीक आहे. दुय्यम रंग केशरी, हिरवा, जांभळा हे आहेत. केशरी व नारंगी रंग त्यागाचे प्रतीक आहे. हिरवा रंग समृद्धीचे प्रतीक तर जांभळा रंग ऐश्‍वर्याचे प्रतीक आहे. गुलाबी रंग प्रेमाचे प्रतीक आहे. असे प्रत्येक रंगाला विविध अर्थ आहेत.

संत चोखामेळा म्हणतात, काय भुललासी वरलिया रंगा. चित्रकार, लेखकांनाच नव्हे तर संतांनाही रंगांनी भूल पाडली आहे. एवढेच काय देशाच्या ध्वजावरही जे रंग आहेत, ते विचारपूर्वक निवडले गेले आहेत. जीवनात, मनात रंग नसतील तर जगणे व्यर्थ आहे. विविध रंगांमध्ये न्हाऊन जीवनाचे सार्थक करावे, फक्‍त रंग कोणते निवडावेत हे आपल्याच हाती आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.