पुणेकरांनो, पाणी काटकसरीनेच वापरा

शहरातील विविध भागांत महापालिका जनजागृती करणार
आचारसंहिता शिथील होताच पाणीकपात अटळ

बळी कोणाचा जाणार?
पाणी काटकसरीने वापरण्याविषयीचे आवाहन महापौरांच्या नावे, करायचे की प्रशासनातर्फे? याचा निर्णय या आठवड्यात घेण्यात येणार आहे. यामध्येही राजकारण रंगणार असून, सत्ताधाऱ्यांना विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागणार आहे. सत्ताधाऱ्यांच्या वतीने आवाहन करायचे, तर पाणीकपातीचे खापर त्यांच्या माथ्यावर फुटणार आणि प्रशासनाच्या नावे द्यायचे तर नेहमीप्रमाणे प्रशासन टीकेचा धनी होणार. त्यामुळे यात आता बळी कोणाचा जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पुणे – पाणी काटकसरीने वापरण्याविषयी महापालिका जनजागृती करणार असून, मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सोसायट्यांमध्ये आणि संपूर्ण शहरात विविध ठिकाणी पाणी काटकसरीने वापरण्याविषयी जनजागृती करण्यात येणार आहे.

आचारसंहिता शिथील झाल्यानंतर पाणीकपात अटळ होणार आहे. त्याची मानसिक तयारी नागरिकांना करावी लागणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून पाणी काटकसरीने वापरण्याविषयीचे आवाहन नागरिकांना करण्यात येणार आहे. आवाहनाचा मसुदा महापालिका प्रशासन मंजुरीसाठी महापौर आणि अन्य पदाधिकाऱ्यांपुढे ठेवणार आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर त्यावर कार्यवाही सुरू होणार आहे.

पाटबंधारे खात्याने महापालिकेचे पाणी तीनवेळा बंद केले होते. ज्यावेळी ते पहिल्यांदा बंद केले, त्यावेळी महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाला पाणीवाटपाचे फेरनियोजन करण्याचे आदेश दिले. ज्या भागात पाणी मिळत नाही त्या भागाला ते मिळण्यासाठी तासांचे फेरनियोजन करण्यात आले. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. फेरनियोजनाआड महापालिका पाणीकपात करत असल्याचा आरोप करण्यात आला.

त्यानंतर पालकमंत्री गिरीश बापट यांनी पाणी काटकसरीने वापरण्याविषयीचे आवाहन केले. त्यावेळी त्यांच्यावर टीका झाली. परंतु लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पाटबंधारे खात्याने 1,350 एमएलडी देण्याचे कबुल केले. मात्र आता धरणसाठा रिकामा होत चालला आहे. शेतीसाठी पाणी देणेही आवश्‍यक आहे. त्यामुळे आता कोणत्याही परिस्थितीत पाणी काटकसरीने वापरणे अत्यावश्‍यक झाले आहे. याबाबत महापालिका प्रशासनातर्फे जागृती व्हावी यासाठी रेडिओ मिर्ची, चित्रपट गृह, गृहनिर्माण प्रकल्प, सोसायट्यांमध्ये स्टिकर्स, पोस्टर्स लावले जाणार आहेत. यासाठी महापौर, पक्षनेते, पदाधिकारी यांची परवानगी आवश्‍यक आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.