दरवाजे उघडे ठेवून धावली बीआरटी बस

प्रवाशांच्या जिवाशी खेळ ः अर्ध्या रस्त्यात बस अडवून परत आगारात पाठवली

पिंपरी – दरवाजे उघडे ठेऊन पीएमपीची बीआरटी बस धावत असल्याचा धक्‍कादायक प्रकार बुधवारी समोर आला. बीआरटी बसचे दरवाजे मोठे असतात, त्यामुळे धावताना हे दरवाजे बंद ठेवणे बंधनकारक आहे. परंतु चिंचवड ते पुणे दरम्यान धावणाऱ्या बसमधून प्रवाशांना धोकादायक प्रवास करावा लागला आहे. ही घटना एका जागरुक नागरिकामुळे उघडकीस आली असून याबाबत तात्काळ संबधित आगाराकडून कारवाई करण्यात आली आहे.

मनपा ते चिंचवड (मार्ग क्र.36) या मार्गादरम्यान बीआरटी बसचे दरवाजे उघडे असलेली बस धावत होती. उजवीकडील भला मोठा दरवाजा उघडा असल्याने बस भरधाव वेगाने धावत असल्यास प्रवासी पडून अपघात होण्याची शक्‍यता असते. ही धोकादायक बाब एका नागरिकाच्या लक्षात आल्यावर तातडीने त्या बसला थेरगाव विसर्जन घाट पूलावर थांबवण्यात आले. नंतर पुढील थांब्यावर प्रवासी उतरुन ती बस आगारात पाठवण्यात आली.

या बसमधील प्रवाशांना उतरुन दुसऱ्या बसमधून पाठवून दिले. याबाबत चालकाकडे विचारणा केली असता या बसचे दरवाजेच लागत नसल्याचे चालकाने सांगितले. अशा धोकादायक परिस्थितीत बस डेपोबाहरे आलीच कशी, हा प्रश्‍न उपस्थित होत आहे. याबाबत न.ता.वाडीचे आगार प्रमुख दत्तात्रय झेंडे यांनी सांगितले की, ती बस तातडीने काढून टाकली आहे. तसेच, ठेकेदाराला दंड ठोठावण्यात आला असून याबाबत अधिक चौकशी सुरु करण्यात आली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.