मायणी -गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने मायणी परिसरात पुन्हा दमदार एन्ट्री करत अक्षरश: कहर केला. 20 वर्षानंतर मायणी, कलेढोण, चितळीसह मोराळे, विखळे, पाचवड, कानकात्रे, तरसवाडी, गारुडी या गावांमध्ये पावसाने धुवाधार हजेरी लावल्याने या सर्व गावांमधील तलाव, बंधारे व मायणी येथील चांद नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली. त्यामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तर नद्या नाल्यांनी पातळी ओलांडल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पावसामुळे मायणी येथील मल्हारपेठ-पंढरपूर मार्गावरील पूल वाहून गेला असून वाहतूक पूर्णत बंद झाली आहे.
पावसाच्या या हाहाकारामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हीच परिस्थिती वीस वर्षांपूर्वी झाली होती. सततच्या संततधार पावसामुळे मायणी येथील पंढरपूर मल्हारपेठ हायवे वरील दोन्ही पूल पाण्याखाली गेले असून त्यापैकी म्हसवड-कलेढोणकडे जाणारा पूल वाहून गेला असल्याने त्या भागातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पंढरपूर-मल्हारपेठ या मार्गावरील रस्त्याचे काम चालू असल्याने मायणीत तात्पुरत्या स्वरूपात दगड-मातीचे पूल तयार करण्यात आले होते.
त्यापैकी दोन्ही पूल हे गेल्या पावसातच वाहून गेले होते. तद्नंतर ठेकेदाराने ते पुन्हा नव्याने तयार केले होते परंतु काल झालेल्या धुवाधार पावसामुळे हे दगड मातीचे तात्पुरते पूल पुन्हा वाहून गेले असल्याने मायणी कडे येणाऱ्या गावांचा संपर्क तुटला आहे व या मार्गावरील वाहतूक पूर्णता बंद झाली आहे ती वाहतूक कातरखटाव मार्गे वळवण्यात आली आहे.