पुणे – शहरातील बाधित संख्येबरोबर सक्रिय बाधित आणि अत्यवस्थ बाधितांची संख्या कमी होत असल्याचे दिसून येते. मागील पंधरा दिवसात 15 हजारांच्या पुढे असलेली सक्रिय बाधितांची संख्या आज 10 हजारापर्यंत खाली आहे. तर दिवसभरात नव्याने 549 बाधित सापडले आहेत. गेल्या 24 तासांत करोनामुळे 24 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. यामध्ये शहर हद्दीतील 21 तर ग्रामीण व अन्य जिल्ह्यांतील 3 जणांचा समावेश आहे.
ऑक्टोबर महिन्याच्या सुरवातीपासून शहरातील बाधित संख्या झपाट्याने कमी झाली आहे. तर गेल्या तीन दिवसांपासून या संख्येत आणखी घट झाली असून, दीड ते दोन हजारांवर पोहचलेली बाधित संख्या आज तब्बल पाचशेपर्यंत खाली आली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला आहे.
बाधितांची संख्या अधिक खाली येण्याकरिता प्रयत्न होत आहेत. मात्र, मृत्युची संख्या कमी होणे हे प्रशासनासमोरील मोठे आवाहन आहे. गुरूवारी (दि. 15) दिवसभरात 4 हजार 220 संशयितांची नमुने तपासणी करण्यात आली आहे.
सक्रीय बाधितांची संख्या कमी होत असून 10 हजार 536 बाधितांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्यातील 835 जणांची प्रकृती चिंताजनक असून, 450 बाधित व्हेंटिलेटरवर आहेत. तर 386 बाधित अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे.
आज दिवसभरात 825 बाधित करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे शहरातील करोनामुक्त झालेल्यांची संख्या 1 लाख 41 हजार 688 वर पोहचली आहे. तर एकूण बाधित संख्या 1 लाख 56 हजार 144 वर पोहचली आहे.