खटाव तालुक्याच्या उत्तरभागाला मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. पावसामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेकठिकाणी नदी, ओढ्यांना पूर आला आहे. तर शेत जमिनीत मोठ्या प्रमाणात पाणी साठून शेतीसह पिकांचेही नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी मंदिरांमध्ये तसेच स्मशानभूमीतही पाणी घुसल्याने दयनीय अवस्था झाली आहे.
बाणगंगा नदीचे पाणी शनीनगर भागातील घरात
फलटण -बुधवारी दिवसभर पडलेल्या संततधार मुसळधार पावसामुळे फलटणच्या बाणगंगा नदीला पूर आला आहे. नदी किनाऱ्यालगत असणाऱ्या शुक्रवार पेठ, शनिनगर या परिसरात रात्री घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांचे नुकसान झाले. पुराचे पाणी घरांमध्ये शिरलेले समजताच प्रभागातील नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर व नगरसेविका सौ. प्रगती कापसे, भाऊसाहेब कापसे यांनी त्याठिकाणी जाऊन पाहणी केली. तसेच या भागातील नागरिकांची तात्पुरती राहण्याची सोय शाळा क्रमांक 1 मध्ये केली.