गणेशोत्सव आणि मोहरमनिमित्त 50 वर्षांची परंपरा अबाधित
लोणी काळभोर – आजच्या काळात देशात सर्वत्र सर्वधर्म समभावाची शिकवण देण्याची गरज वाटत आहे. परंतु हवेली तालुक्यातील लोणी काळभोर गावात मात्र, अनेक वर्षांपासून विठ्ठल मंदिर व शंकराच्या मंदिराच्या मधोमध मुस्लहम समाजाची मशिद आहे. विठ्ठल मंदिरासमोर महात्मा गांधी तरुण मंडळाच्या वतीने गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली असून त्याच्या शेजारीच मोहरमनिमित्त ताजियाची स्थापना करण्यात आली आहे. या सणातून ऐक्याचे दर्शन घडवून आणले आहे. 25
पुणे शहराशेजारी असलेले लोणी काळभोर (ता. हवेली) हे गाव राजकीयदृष्ट्या संवेदनशील आहे. शहराला खेटून असल्याने नागरिकीरणाचा वेग प्रचंड आहे. त्यामुळे काही वर्षांत या परिसरातील लोकसंख्या वाढली आहे. मात्र, तरीही येथील सामाजिक, धार्मिक सलोख्याची वीण घट्ट आहे. स्थानिक राजकारणी, नागरिक, विविध शासकीय खाती यांच्यातील एकमेकांना सहकार्य करण्याच्या वृत्तीने जातीपातीच्या अदृश्य भिंती कधीच गळून पडल्या आहेत. याची प्रचीती दिसून येत आहे.
विठ्ठल मंदिर व शंकर मंदिराच्या मध्ये असलेली मुस्लीम समाजाची मशिद. ही परंपरा शेकडो वर्षे जुनी आहे. विठ्ठल मंदिरासमोरच महात्मा गांधी तरुण मंडळ दरवर्षी गणेशोत्सव साजरा करते. यंदाही मंडळाने गणपती नेहमीच्या ठिकाणी बसवला आहे. गणपती शेजारीच मुस्लीम समाजाने मोहरमनिमित्त ताजियाची आजच प्रतिष्ठापना केली आहे. ताजियाची प्रतिष्ठापना करण्याचा मान येथील इनामदार बंधूकडे आहे.
आज एकादशी असल्याने विठ्ठल मंदिरात भजन कीर्तन सुरू आहे. पन्नास वर्षांपासून ही परंपरा सुरु आहे. सोमवारी (दि.9) प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या ताजियाचे उद्या विसर्जन करण्यात येणार आहे. देशात असहिष्णुतेचे वातावरण असताना सामाजिक वातावरण गढूळ बनत आहे. परंतु लोणी काळभोरवासियांनी सामाजिक सलोख्याचा सेतू बांधून आदर्श निर्माण केला आहे.