विजय शिंदे
वडापुरी -लग्नाला येऊ नका. करोना व्हायरसचा संसर्ग होण्याची शक्यता असल्याने माझ्या मुलीच्या, मुलाच्या लग्नाला येऊ नका. आम्ही लग्न थोडक्यात करायचं ठरवलं आहे, असे सांगण्याची वेळ वधू-वराच्या पित्यांवर आली आहे.
वाढत्या करोनामुळे सगळ्यांना लॉकडाउनचा सामना करावा लागत असतानाच एप्रिल-मे महिन्यात होणारे अनेक विवाहसोहळेही ‘लॉक’डाउन झाले आहेत. सध्याची अनिश्चतता, एकूणच कठीण परिस्थिती पाहता अनेकांनी थेट सोहळा पुढे ढकलत किंवा कुटुंबीयांसोबत सुरक्षित अंतर ठेवून बोहल्यावर चढण्याचा निर्णय घेतला आहे.
आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा व पुन्हा न येणारा प्रसंग पुढे ढकलावा लागल्यामुळे जोडप्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. लग्नसोहळ्याविषयी पाहिलेल्या स्वप्नांवर पाणी सोडावे लागत आहे. अनेक लग्नघरांमध्ये सध्या, विवाह सोहळ्याचे नियोजन कशाप्रकारे करावे यावर चर्चा होत आहेत. खबरदारीची उपाययोजना म्हणून आता किमान चार ते पाच महिने तरी लग्नाचा विचार करू नये, असे निर्णय परस्परांच्या संमतीने घेतले जात आहेत.
भटजीही उपलब्ध होईना
करोनासदृश्य परिस्थिती असल्याने शहरी भागात हॉल उपलब्ध होत नाहीत. नातेवाईकांची मर्यादा असल्याने तितकीच माणसं लग्नाला येतील याचा भरवसा देता येत नसल्याने वधू-वरांच्या वडिलांची अडचण होत आहे. लग्नकार्यासाठी नियमांचे पालन न झाल्यास कारवाई होईल या भीतीने लग्नविधी पार पाडण्यासाठी भटजीही उपलब्ध होत नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
कारवाईपेक्षा करोनाची भीती
लग्नसोहळ्यामध्ये नियम न पाळल्यास कारवाई होईल, या भीतीपेक्षाही ग्रामीण भागात आता करोनाची भीती जास्त असल्याने नियमांचे पालन करूनच लग्नसोहळ्याचे आयोजन केले जात असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षभरापासून विवाह सोहळ्यातून संसर्ग अधिक बळावला असल्याचे चित्र दिसून आले आहे. त्यामुळे कारवाईपेक्षा करोनाची भीती सर्वांना आहे.