पुणे – ग्रामीण भागात करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढू लागल्यामुळे हॉटस्पॉट गावांच्या संख्येत वाढ झाली आहे. करोनाच्या पहिल्या लाटेत 144 हॉटस्पॉट गावे होती. मात्र, दुसऱ्या लाटेत ही संख्या दुपटीने वाढली. 14 एप्रिलपर्यंत तब्बल 308 करोना हॉटस्पॉट गावे ठरली आहेत.
ग्रामीण भागात एकीकडे 444 गावांमध्ये आता एकही सक्रिय करोनाबाधित नाही, तर दुसरीकडे 308 गावे हॉटस्पॉट बनली आहे. त्यामध्ये शिरूर, जुन्नर, हवेली, दौंड, इंदापूर तालुक्यांत सर्वाधिक हॉटस्पॉट गावे आहेत. पहिल्या लाटेत 20 सप्टेंबर 2020 मध्ये सर्वाधिक 144 हॉटस्पॉट गावांची नोंद झाली.
त्यानंतर जिल्ह्यातील करोना संसर्गाचा वेग मंदावला. त्यामुळे अनेक नियम शिथिल झाले. मात्र, फेब्रुवारी 2021 मध्ये करोनाने पुन्हा डोक वर काढले आणि अवघ्या महिनाभरात 10 मार्च रोजी हॉटस्पॉट गावांची संख्या 41 वर पोहोचली. मार्चअखेर ही संख्या 131 इतकी होती, तर 14 एप्रिल रोजी 308 वर पोहोचली.