दत्ता सानेंची टोलेबाजी : पूर्ण न झालेल्या कामाचेही श्रेय लाटण्याचा प्रयत्न
पिंपरी – भाजपचे सहयोगी अपक्ष आमदार महेश लांडगे यांचा भोसरी मतदारसंघात खोटे बोल, पण रेटून बोल हा प्रकार चाललेला आहे. अनधिकृत बाधकामे, बैलगाडा शर्यत आणि साडेबारा टक्के परताव्याबाबत जाहिरातबाजी करून आमदारांनी पूर्ण न झालेली कामेही आपण केली असल्याचा गाजावाजा चालविला आहे. ही खोट्या जाहिरातीच्या माध्यमातून भोसरीकरांची मोठी फसवणूक केली जात असल्याचा आरोप करत पिंपरी-चिंचवडकरांची भाजपने जाहीर माफी मागावी, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह स्थानिक आमदार लक्ष्मण जगताप व महेश लांडगे यांच्या फोटोसह अनेक फलक झळकत आहेत. आमचे आश्वासने, आमचा पाठपुरावा या शीर्षकाखाली मोठ्या प्रमाणात विकासकामांची जाहिरात करण्यात आलेली आहे. शहरभर लागलेल्या या जाहिरातींबाबत अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. त्यापैकी भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपचे सहयोगी अपक्ष आमदार महेश लांडगे यांनी स्वतंत्र जाहिराती लावल्या आहेत. या जाहिरातींद्वारे त्यांचा खोटा प्रचार सुरू असल्याचा आरोप दत्ता साने यांनी केला आहे.
अनधिकृत बांधकामे नियमित केल्याच्या जाहिराती फसवणुकीचा पहिला प्रकार अनधिकृत बांधकामासंदर्भात आहे. या आमदारांनी बिनधास्त एक हजार चौरस फुटांपर्यंतची अनधिकृत बांधकामे नियमित केल्याच्या जाहिराती लावल्या. प्रत्यक्षात या प्रकारे कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही. राज्य शासनाने अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी जो अध्यादेश काढला.
त्यानुसार अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठी किती अर्ज आले आणि किती जणांची घरे अधिकृत झाली ? हा संशोधनाचा मुद्दा आहे. दुसरा खोटारडेपणा पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या क्षेत्रातील बाधीत शेतकऱ्यांच्या बाबतीत या आमदारंनी केला आहे. प्राधिकरणाने संपादित क्षेत्राचा शेतकऱ्यांना साडेबारा टक्के परतावा मिळवून दिल्याचा प्रचार ते करत आहेत. प्रत्यक्षात साडेबारा टक्के परतावा देण्याबाबतच्या प्रस्तावावर राज्य शासनाकडून कोणताही कायदेशीर निर्णय अद्याप पूर्ण झालेला नाही.
न सुटलेल्या प्रश्नांचेही भांडवल
भोसरी विधानसभा मतदारसंघातील आणि पुणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी बैलगाडा शर्यत हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. बैलगाडा शर्यतीबाबत सरकारने पावले उचलली असली, तरी आणखी या प्रकरणाचा न्यायालयीन तिढा सुटलेला नाही. तसेच, अद्याप कुठेही बैलगाडा शर्यत सुरू झालेली नाही. तरी देखील या प्रश्नाचे भांडवल करून आमदार लोकांची दिशाभूल करत आहेत. या व्यतिरिक्त पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा गवगवा केला जात असताना दुसरीकडे शहरात गुन्हेगारी वाढली आहे. अनेक गैरव्यवहार झाले असून मोठ-मोठे प्रकल्प रखडलेले देखील आहे. तरी देखील भाजपने केलेली ही जाहिरातबाजी म्हणजे सर्वसामान्यांची ही फसवणूक आहे. भाजपच्या सहयोगी आमदारांची ही वर्तवणूक चुकीची आणि निंदनीय आहे. त्यामुळे या आमदारांनी आणि भाजपच्या नेत्यांनी जनतेची जाहीर माफी मागावी, अन्यथा शहरात मोठे जनआंदोलन उभारले जाईल, असा इशारा दत्ता साने यांनी दिला आहे.