मुंबई – केंद्रात डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखाली सरकार असताना महागाईची झळ सामान्य जनतेला पोहचू दिली नाही. यासाठी इंधन व गॅसवर सबसिडीच्या रुपाने मदत दिल्याने त्याचा जनतेला लाभ झाला. ती मदतही मोदी सरकारने आता पूर्णपणे बंद केली आहे. युपीए सरकारवेळी “महंगाई डायन’ वाटणाऱ्या भाजपला आता हीच जीवघेणी महागाई “डार्लिंग’ वाटत आहे, अशा शब्दांत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.
गॅसदरवाढीवरून बोलताना नाना पटोले म्हणाले, केंद्रातील मोदी सरकार सामान्य जनतेला वाऱ्यावर सोडून फक्त दोन-चार उद्योगपती “मित्रों’साठीच काम करत असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. आधीच महागाईने जगणे कठीण झाले असताना पुन्हा स्वयंपाकाचा गॅस 25 रुपयांनी महाग करुन केंद्र सरकारने जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. मोदी सरकार सामान्य जनतेला चिकटलेला जळू असून जळूप्रमाणेच नागरिकांचे रक्तशोषण करत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
2014 साली खोटी स्वप्ने दाखवून सत्तेत आलेल्या मोदी सरकारने शेतकरी, कामगार, सामान्य जनतेसह मध्यमवर्गांचे जगणेही मुश्कील करुन ठेवले आहे. कॉंग्रेस सरकारने उभे केलेले प्रकल्प विकण्याचा एकमात्र उद्योग गत सात वर्षांपासून धडाक्यात सुरु आहे.
सरकारी कंपन्या, बॅंका, विमा, रेल्वे सर्वकाही उद्योगपती मित्रांच्या हवाली करुन देशाचे वाट्टोळे करण्याचे काम सुरु आहे. देशातील जनता मोदी सरकारच्या या कारभाराला कंटाळली असून महागाईवरुन जनतेत प्रचंड आक्रोश आहे, ही जनताच आता भाजपा व मोदींना त्यांची जागा दाखवेल, असेही पटोले म्हणाले.
“उज्ज्वला’च्या नावाखालीही गरिबांची थट्टा
जानेवारी महिन्यापासून मोदी सरकारने सातत्याने दरवाढ करत गॅस सिलिंडर 190 रुपयांनी महाग केला आहे. उज्ज्वला योजनेच्या नावाखालीही गरिबांची थट्टा केली जात आहे. उज्ज्वला योजनेत मोफत गॅसच्या नावाखाली गरिबांचे केरोसिन बंद केले आणि आता गॅस 900 रुपयांपर्यंत महाग केला, एवढा महाग गॅस गरीब, सामान्य जनेतला परवडणारा नाही, असे नाना पटोले म्हणाले.