कोलकता – पश्चिम बंगालमध्ये राजकीय खळबळ उडवणाऱ्या नारद स्टिंग ऑपरेशन प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी आरोपपत्र दाखल केले. त्याची दखल घेऊन विशेष न्यायालयाने त्या राज्याच्या दोन मंत्र्यांविरोधात समन्स जारी करण्याचा आदेश दिला.
बंगालचे मंत्री सुब्रत मुखर्जी आणि फिरहाद हकीम यांच्याबरोबरच सत्तारूढ तृणमूल कॉंग्रेसचे आमदार मदन मित्रा, कोलकत्याचे माजी महापौर सोवन चटर्जी, निलंबित आयपीएस अधिकारी एमएमएच मिर्झा यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले. आता त्या आरोपींना न्यायालयाने 16 नोव्हेंबरला हजर राहण्यास सांगितले आहे.
मनी लॉण्डरिंगबद्दल आरोपींना अधिकाधिक शिक्षा देण्याची मागणी ईडीकडून करण्यात आली आहे. संबंधित प्रकरण नारद न्युज पोर्टलने काही वर्षांपूर्वी केलेल्या स्टिंग ऑपरेशनशी निगडीत आहे. त्या पोर्टलच्या प्रतिनिधींनी व्यावसायिक असल्याचे भासवून तृणमूलच्या काही नेत्यांची भेट घेतली.
बंगालमध्ये व्यवसाय करण्यासाठी मेहेरनजर करण्याच्या उद्देशातून त्या नेत्यांना पैसे देऊ करण्यात आले. ते पैसे तृणमूलचे नेते स्वीकारत असल्याचा व्हिडीओ 2014 मधील लोकसभा निवडणुकीआधी प्रसिद्ध करण्यात आला.
त्या प्रकरणाचा तपास प्रथम सीबीआयने केला. सीबीआयने काही महिन्यांपूर्वी आरोपी असणाऱ्या चारही नेत्यांना अटक केली होती. त्या प्रकरणातील मनी लॉण्डरिंगची चौकशी ईडीकडून करण्यात येत आहे.