टोकियो – टोकियो पॅरालिम्पिकमध्ये बुधवारचा दिवस भारतासाठी निराशाजनक ठरला. सोमवार व मंगळवारी पदके मिळवल्यावर अपेक्षा वाढलेल्या भारतीय खेळाडूंना पदक मिळवण्यात मात्र अपयश आले.
मिश्र दुहेरी स्पर्धेत पराभवाची सुरुवात झाली. भारताच्या 19 वर्षीय पलक कोहलीला बॅडमिंटनमधील महिला एकेरीच्या सामन्यात जपानच्या सुझुकी अयाकोकडून 21-4, 21-7 असा सरळ दोन गेममध्ये पराभव पत्करावा लागला.
पलकला मिश्र गटात प्रमोद भगत याच्यासह खेळताना जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या फ्रान्सच्या फॉस्टिन नोएल व लुज्ञकास मजोर या जोडीकडून 2-1 असा पराभव स्वीकारावा लागला.
दुसरीकडे भारताला महिला एकेरीतील नेमबाजीत सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नेमबाज अवनी लेखराला 10 मीटर एअर रायफल मिश्र स्पर्धेत अपयशाचा सामना करावा लागला.
एकेरीत सुवर्णपदक विजेती असलेल्या अवनीला आपल्या यशाची पुनरावृत्ती करण्यात अपयश आले. बुधवारी मिश्र 10 मीटर एअर रायफल प्रोन (एसएच 1) नेमबाजी स्पर्धेच्या पात्रता फेरीत अवनी अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवू शकली नाही. पात्रता फेरीत झालेल्या सुमार कामगिरीमुळे तिला 27 व्या स्थानावर समाधान मानावे लागले.
पुरुषांच्या गटात भारतीय पॅरा नेमबाज सिद्धार्थ बाबू व दीपक कुमारलाही अपयशाचा सामना करावा लागला. अवनीने दोन दिवसांपूर्वी पहिल्याच पॅरालिम्पिक स्पर्धेत महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्टॅण्डिंग एसएच- 1 गटात देशाला सुवर्णपदक जिंकून देताना इतिहास रचला होता. नेमबाजीत भारतीय खेळाडूंनी बुधवारी पूर्ण निराशा केली. आतापर्यंत भारताने यंदाच्या स्पर्धेत दहा पदके मिळवली आहेत.