पाणी टाकी लोकार्पण सोहळ्यासाठी राष्ट्रवादी, भाजपत ताणाताणी; कार्यक्रम पुढे ढकलला
पुणे – महापालिकेतील पूर्ण होणाऱ्या कामांच्या उद्घाटनांवरून श्रेयवादाच्या लढायांना सुरूवात झाली आहे. यातून महापालिका निवडणुकांचे पडघम ऐकू येत आहेत. महादेवनगर येथील पाण्याच्या टाकीचा लोकार्पण सोहळा या श्रेयवादाच्या लढाईमुळेच पुढे ढकलण्यात आला आहे.
भाजपच्या लोकप्रतिनिधींनी पाच दिवसांपूर्वी स्वारगेट पाणी पुरवठा केंद्रात केलेले आंदोलन हे श्रेयवादातूनच केल्याचे समोर आले आहे तर महादेवनगर येथील टाकीचे लोकार्पण कोणाच्या हस्ते करायचे यावरून पक्षीय भूमिका आड आल्याने लोकार्पण सोहळाच पुढे गेला आहे.
याचा तपशील असा की, महादेवनगर येथील पाण्याच्या टाकीचे काम राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माजी नगरसेविका भारती प्रकाश कदम यांनी सुरू केले होते ते नुकतेच पूर्ण झाले आहे. सध्या, या प्रभागामध्ये कदम यांचे पती प्रकाश कदम आणि माजी महापौर दत्तात्रय धनकवडे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक असून मनीषा कदम आणि राणी भोसले या भाजपच्या नगरसेविका आहेत. या टाकीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत करावे, असे पत्र प्रकाश कदम यांनी दिले होते.
तर, भाजपच्या नगरसेविकेने या टाकीचे उद्घाटन पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत करण्याचे पत्र दिले होते. हा कार्यक्रम ऑनलाइन करण्याचे निश्चित झाले. परंतु, त्या आधीच माजी आमदार योगेश टिळेकर यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन झाल्याने हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला.
कार्यक्रमाचा मुहूर्त लवकरच…
पाण्याची टाकी असलेल्या प्रभागामध्ये राष्ट्रवादी आणि भाजपचे प्रत्येकी दोन सदस्य आहेत. सर्व स्थानिक नगरसेवकांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या सुचनेनुसार टाकीचे उद्घाटन करूया, असे पालकमंत्र्यांना कळवले आहे. त्यांनीही याला सकारात्मक प्रतिसाद दिला असून नवीन तारीख (मुहूर्त) लवकरच ठरवण्यात येईल, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.