दुबई – आशिया करंडक स्पर्धा आता 2023 साली होणार असल्याचे आशिया क्रिकेट समिती, पाकिस्तान क्रिकेट मंडळ व श्रीलंका क्रिकेट मंडळाने जाहीर केले आहे. यावर्षी जून महिन्यात या स्पर्धेचे श्रीलंकेत आयोजन करण्यात आले होते. मात्र, करोनाचा धोका पाहता ही स्पर्धा स्थगित करण्याची घोषणा केली.
गेल्या वर्षी ही स्पर्धा पाकिस्तानात होणार होती. मात्र, करोनामुळेच तेव्हाही ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. करोनाचा धोका असल्यामुळे ही स्पर्धा आता दोन वर्षांनी घेण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
स्पर्धेत सहभागी होत असलेल्या देशांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे दोन वर्षे तरी या स्पर्धेसाठी विंडो मिळणार नाही. त्यामुळे आशिया करंडक स्पर्धा लांबणीवर टाकावा लागत आहे. आता ही स्पर्धा 2023 साली होईल. पुढील वर्षी या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे.