Who Is Yash Thakur : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 च्या 21 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स (LSG) ने गुजरात टायटन्स (GT) चा 33 धावांनी पराभव केला. लखनौच्या भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर रविवारी (7 एप्रिल) खेळल्या गेलेल्या या सामन्यात यजमान संघाने 164 धावांचे लक्ष्य ठेवले होते. याला प्रत्युत्तर देताना गुजरात टायटन्सचा संघ केवळ 130 धावांवरच आटोपला.
लखनौ सुपर जायंट्सच्या या विजयाचा नायक होता वेगवान गोलंदाज यश ठाकूर…! त्याने शानदार गोलंदाजी करत 30 धावांत 5 बळी घेतले. आयपीएल 2024 मध्ये पहिल्यांदाच एका गोलंदाजाने पाच विकेट घेतल्या. यशने ( #YashThakur ) त्याच्या पहिल्याच षटकात गुजरातचा कर्णधार शुभमन गिलला बोल्ड केले. यानंतर, यशला पुन्हा गोलंदाजीची सोपविली तेव्हा त्याने दोन विकेट घेत निर्धाव षटक टाकले. मात्र, यशला त्याच्या तिसऱ्या षटकात कोणतेही यश मिळाले नाही. मात्र शेवटच्या षटकात त्याने दोन विकेट घेत आपल्या पाच विकेट तर पूर्ण केल्याच शिवाय संघाला विजयदेखील मिळवून दिला.
A proud person in this pic (oh and Yash is there too 😋) pic.twitter.com/5pmfDXkSTH
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) April 7, 2024
शुभमन गिल व्यतिरिक्त यश ठाकूरने विजय शंकर, राशिद खान, राहुल तेवतिया आणि नूर अहमद यांची विकेट घेतली. यश ठाकूरची ( #YashThakur ) ही कामगिरी खूप महत्त्वाची आहे. या सामन्यादरम्यान लखनऊचा वेगवान गोलंदाज मयंक यादव दुखापतग्रस्त झाला होता, अशा परिस्थितीत विकेट घेण्याची जबाबदारी त्याच्यावर आली आणि यशने आपल्या संघाचा विश्वास सार्थकी ठरवत चमकदार कामगिरी केली. मयंक आणि मोहसीन खान या वेगवान गोलंदाजांच्या दुखापतीमुळे लखनौ संघाला यश ठाकूरकडून आगामी सामन्यांमध्येही दमदार कामगिरीची अपेक्षा असेल.
यश ठाकूर धोनी-उमेश यांना मानतो आपला आदर्श…
यश ठाकूर ( #YashThakur ) याचा जन्म 28 डिसेंबर 1998 रोजी कोलकाता येथे झाला. मात्र, तो विदर्भासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळतो. विशेष म्हणजे यशला त्याच्या क्रिकेट करिअरच्या सुरुवातीला यष्टिरक्षक बनायचे होते. यष्टीमागे यशचा आदर्श भारतीय दिग्गज महेंद्रसिंग धोनी होता. एकदा विदर्भाचा माजी कर्णधार आणि प्रशिक्षक प्रवीण हिंगणीकर यांनी यश ठाकूरला नेटमध्ये गोलंदाजी करताना पाहिलं आणि नंतर त्याला वेगवान गोलंदाज होण्याचा सल्ला दिला. या युवा खेळाडूला वेगवान गोलंदाजीत करिअर करण्यासाठी पटवणे हे हिंगणीकर यांच्यासाठी अवघड काम होते. पण त्यात ते यशस्वी झाले.
25 वर्षीय यश ठाकूरने ( #YashThakur ) विदर्भासाठी आतापर्यंत 22 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 67 बळी घेतले आहेत. यशच्या नावावर 37 लिस्ट-ए सामन्यांमध्ये 54 विकेट आहेत. यशला 49 टी-20 सामने खेळण्याचा अनुभव आहे, ज्यामध्ये त्याने 74 विकेट घेतल्या आहेत. यश ठाकूर भारतीय वेगवान गोलंदाज उमेश यादवला आपला आदर्श मानतो. उमेश देशांतर्गत क्रिकेटमध्येही विदर्भाचे प्रतिनिधित्व करतो.
गेल्या आयपीएलमध्येही केली होती दमदार कामगिरी…
आयपीएल 2023 च्या लिलावात लखनौ सुपर जायंट्सने यश ठाकूरला 45 लाख रुपयांना विकत घेतले. त्या मोसमात यशने लखनौसाठी 9 सामने खेळले. या काळात त्याने 9.08 च्या इकॉनॉमी रेटने 13 विकेट घेतल्या. आता आयपीएल 2024 हा देखील यशसाठी चांगला मोसम ठरत आहे. चालू मोसमात त्याने तीन सामन्यांत एकूण 6 बळी घेतले आहेत.