पुढील दोन-तीन दिवसांत तापमान घटण्याची चिन्हे
पुणे – पावसाचे वातावरण दूर झाल्याने राज्यात लवकरच थंडीची चाहुल सुरू लागली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत तापमानात घट होण्याचा अंदाज आहे.
प्रत्यक्षात नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये जास्त थंडी असते. कारण, या काळात उत्तरेकडून शीत लहरी मोठ्या प्रमाणावर येत असल्याने राज्यात थंडीचा मोसम सुरू होतो. पण, यंदा चक्रीवादळांच्या संकटामुळे थंडी लांबली आहे. पण, आता हे ढग दूर झाले आहेत. गेले दोन दिवसांपासून सकाळच्या सुमारास धुके पसरू लागले आहे. पुणे शहरातही हवेत गारवा निर्माण होत आहे, पण दुपारी मात्र उकाडा वाढत आहे.
नोव्हेंबरअखेर का होईना पावसाने आता विश्रांती घेतली आहे. यानंतर आता शहरात गुलाबी थंडीचे आगमन होत असून पहाटेच्या सुमारास शहर परिसरात दाट धुके पसरत आहेत. त्यामुळे हिवाळा सुरू झाल्याची चाहूल पुणेकरांना लागली आहे.