दोन महिन्यांत रुग्णांच्या संख्येत वाढ; माहितीसाठी फेसबुक, व्हॉटस्ऍप, ट्विटरचा उपयोग
कराड – यंदा अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली पूरपरिस्थिती आणि त्यानंतर पडलेला परतीचा पाऊस यामुळे डासांचे प्रमाण वाढतच चालले आहे. पालिका प्रशासन स्वच्छता व धूर फवारणी करत असले तरीही डासांचे प्रमाण कमी झाल्याचे दिसत नाही. परिणामी शहरात डेंग्यूच्या साथीने थैमान घातले आहे.
तीन महिन्यात दोन बळी गेले असून अनेकजण डेंग्यूसदृश्य रोगाने आजारी आहेत. नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी पालिका प्रशासन प्रयत्नशील आहेच. शिवाय सध्याच्या इन्फरमेशन टेक्नॉलॉजीच्या जमानात फेसबुक, व्हॉटस्ऍप व ट्वीटरवरूनही सोशल जागर सुरू असल्याचे दिसत आहे.
स्वच्छ सर्वेक्षणात आघाडी घेतलेल्या कराड शहराला गेल्या तीन महिन्यात डेंग्यूच्या साथीने विळखा घातला आहे. सतत पडणाऱ्या पावसाने रस्त्यांवर पडलेल्या डबक्यांमध्ये पाणी साचून राहिल्याने डासांची उत्पत्ती वाढत आहे. तसेच कर्मवीर भाऊराव पाटील पुतळ्या पाठीमागील जागा, आंबेडकर क्रीडांगणावर वाढलेले गवत व घाणीचे साम्राज्य शहरात अशी काही आणखी ठिकाणे आहेत की ज्यामुळे डासांचे प्रमाण वाढत आहे. शहरातील इतर ठिकाणी जंतूनाशक फवारणी व स्वच्छता करण्याबरोबरच या परिसराकडेही पालिकेने लक्ष देणे गरजेचे आहे.
दुसरा बळी गेल्यानंतर पालिकेला जाग आली असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही. सध्या शहरात 55 ठिकाणी डेंग्यूची माहिती देणारे फलक पालिकेकडून लावण्यात आले असून एलईडी स्क्रीनद्वारेही माहिती दिली जात आहे. त्याचबरोबर आशा स्वयंसेविका व ग्रीनी टीमच्या माध्यमातून घरोघरी माहिती पत्रके वाटली जात आहे. तसेच डेंग्युच्या आळ्यांची तपासणी करण्याचे काम सुरू आहे.
याचबरोबरच सर्वसामान्य नागरिकांनाही या उपक्रमात सहभाग घेतला आहे. आजकाल सोशल मिडीयाचा जास्तीत जास्त वापर केला जात असल्याने याद्वारे जनजागृती करण्याचा प्रयत्न सुरू आहे. डेंग्यूच्या साथीची लक्षणे, घ्यावयाची काळजी व प्रतिबंधात्मक उपाय याची सविस्तर माहिती दिली जात आहे.
नागरिकांनी या माहितीद्वारे डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी आपले घर, आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा, डेंग्यूची प्राथमिक लक्षणे दिसताच तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन सोशल मिडीयाच्या विविध माध्यमातून केले जात आहे.
डेंग्यूची लक्षणे…
एकदम जोराचा
ताप चढणे
डोक्याचा पुढचा भाग अतिशय दुखणे
डोळ्यांच्या मागील भागात वेदना
चव आणि भूक नष्ट होणे
छाती आणि वरील अवयवांवर गोवरासारखे पुरळ येणे
मळमळणे आणि उलट्या
त्वचेवर व्रण उठणे
प्रतिबंधात्मक उपाय
डासांना आळा घालणे हा एकमेव उपाय रोग प्रसरण्यापासून थांबू शकतो. घराच्या आजूबाजूला पाणी साठू न देणे, वेळच्यावेळी साठलेले पाणी रिकामे करणे या गोष्टी डासांना प्रतिबंध करू शकतात. संपूर्ण अंगभर कपडे घातल्याने डासांपासून आपले संरक्षण होऊ शकते.
घ्यावयाची काळजी
ताप असेपर्यंत आराम करावा व डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. निर्जलीकरण होऊ नये म्हणून जलपेयांचा भरपूर उपयोग करावा. (उदा. क्षार संजीवनी) रक्तस्राव किंवा शॉकची लक्षणे असल्यास रुग्णाला ताबडतोब रुग्णालयात भरती करावे. पपयाचा वापर हा डेंगू बरा करण्यासाठी केला जातो.