पुणे – ड्रग्जमाफिया ललित पाटील प्रकरणात अरविंद लोहारे याने येरवडा कारागृहात बसून नाशिकमध्ये ड्रग्ज कारखाना उभारण्यासाठी मदत केली होती. त्याला मुंबई पोलिसांकडून ताब्यात घेत न्यायालयात हजर करण्यात आले. 25 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, “मला जेवढी होती, तेवढी माहिती मी मुंबई पोलिसांना दिली आहे. आता मला सोडा अशी न्यायालयात विनंती केली.
भाऊ भूषण पाटील आणि भागिदार अभिषेक बलकवडे यांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने आणखी एक दिवस वाढ केली. अरविंद याने भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे यांना कारखाना उभारणीसाठी मदत केली होती. त्याने बी.एस्सी. केमिकलपर्यंत शिक्षण घेतले आहे. मेफेड्रोन तयार कसे करायचे, हे कारागृहात त्याने ललित पाटीलला सांगितले. त्यासाठी ललित पाटीलने त्याला 35 लाख रुपये दिले. लोहारे याच्यावर नाशिक आणि इगतपुरी येथे गुन्हे दाखल आहेत.
दरम्यान, कैदी असलेल्या अरविंद लोहारे याच्या सांगण्यावरुन हरिश पंत याने भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे यांची प्रत्यक्षात भेट घेतली. त्यानंतर शिवाजी शिंदे आणि राहुल पंडित यांच्या मदतीने कारखाना सुरू केला. तो चाकण येथील ड्रग प्रकरणात सन 2020 पासून ललित पाटीलसोबत कारागृहातील न्यायालयीन कोठडीत होता, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.