उपाध्यक्ष पांडुरंग अभंग यांचा इशारा
नेवासा – शासन मुळा धरणाचे पाणी जायकवाडी धरणामध्ये सोडण्याच्या तयारीत आहे. आमच्या हक्काचं पाणी आम्ही जाऊ देणार नाही. त्यामुळे मुळा धरणाचे पाणी जायकवाडीत सोडल्यास शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरू, असा इशारा ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष, माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी दिला.
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे 50 व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नि प्रदिपन कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांचे हस्ते व कारखान्याचे उपाध्यक्ष, माजी आमदार पांडुरंग अभंग यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी अभंग बोलत होते.
अभंग म्हणाले की, यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्यामुळे ऊस पिकाची परिस्थिती फारशी चांगली नाही, एकरी उत्पादन घटणार आहे. हलक्या जमिनीत वाळवी लागली आहे. त्यामुळे किती दिवस कारखाने चालतील ही मोठी शंका आहे. परंतु आपल्या कार्यक्षेत्रात 17 लाख टन उसाची नोंद झालेली आहे. वेळेत ऊस तुटणार असल्याने शंभर टक्के ऊस ज्ञानेश्वरलाच द्यावा लागेल.
शेतकी खात्यामार्फ़त घेण्यात येणाऱ्या ऊस लागवड नोंदीत पारदर्शकता व सूसूत्रता यावी, यासाठी प्रत्यक्ष शेतावर जाऊन मोबाईल ऍपद्वारे नोंदी घेण्यात येणार आहेत. त्याच बरोबर ऊस गाडीच्या वजनाचा मेसेज तात्काळ संबधित शेतकऱ्यांचे मोबाईलवर जाणार आहे.
कारखान्याचे ज्येष्ठ संचालक ऍड. देसाई देशमुख, काकासाहेब नरवडे, काशिनाथ नवले, काकासाहेब शिंदे, पंडितराव भोसले, प्रा.नारायण म्हस्के, भाऊसाहेब कांगुणे, मच्छिद्र म्हस्के, बबनराव भुसारी, सखाराम लव्हाळे, दीपक नन्नवरे, लक्ष्मण पावसे, विष्णू जगदाळे, अशोक मिसाळ, दादासाहेब गंडाळ, रामभाऊ जगताप, प्रभाकर कोलते, ज्ञानदेव दहातोंडे,
तांत्रिक सल्लागार एस.डी.चौधरी, एम.एस.मुरकुटे, महेंद्र पवार, चीफ इंजिनिअर राहुल पाटील, मुख्य शेतकी अधिकारी सुरेश आहेर उपस्थित होते. संचालक जनार्दन कदम व संजीवनी कदम, इंजि. दीपक नवले व राधा नवले यांचेहस्ते बॉयलर पूजा करण्यात आले. संचालक शिवाजी कोलते यांनी आभार मानले.