876 कोटी निधीच्या कामांना प्रशासकीय मान्यताः काळे
कोपरगाव – काकडी येथील श्री शिर्डी विमानतळाच्या उर्वरित विकास कामांसाठी 490 कोटी 74 लाख निधीस सुधारित प्रशासकीय व वित्तीय मान्यता तसेच नवीन टर्मिनल इमारत व इतर विकासकामांसाठी 876 कोटी 25 लाख निधीस प्रशासकीय व वित्तीय मान्यता मिळाल्याने विमानतळाचा लूक बदलणार असल्याचे मत आ.आशुतोष काळे यांनी व्यक्त केले.
शिर्डी विमानतळाचा संपूर्ण विकास होण्यासाठी अधिक निधी मिळावा, यासाठी आ.काळे यांचा पाठपुरावा सुरू होता. विमानतळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी उर्वरित विकास कामांसाठी 490 कोटी 74 लाख निधीस सुधारित प्रशासकीय व वित्तीय मान्यता तसेच नवीन टर्मिनल इमारत व इतर तत्सम विकास कामांसाठी 876 कोटी 25 लाख निधीस प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात आली आहे.
यामध्ये लॅण्डस्केपिंग व सुशोभिकरण, प्रवेशद्वार, विभक्त भिंत, अग्निशामक केंद्रासाठी पाण्याची भूमिगत टाकी आणि क्रॅश गेट्सचे बांधकाम करणे, दोन अतिउच्च दाबाच्या विद्युवाहिन्यांचे वळतीकरण करणे,
धावपट्टीचे रीकार्पेटींग व सलग्न कामे, विमानतळामधील पाणी वितरण व सांडपाणी वाहून नेणारी सिस्टिम तसेच पाणी प्रक्रिया केंद्र, सीआयएसएफ कर्मचारी वसाहत, कार्गो कॉम्प्लेक्स, हवाई वाहतूक प्रशिक्षण संस्था इ. साठी आवश्यक असणाऱ्या प्रस्तावित 127 हे. जागेचे भूसंपादन करणे आदी कामांसाठी हा निधी वापरण्यात येणार आहे.