मुंबई – साऊथ चित्रपटांचा लोकप्रिय अभिनेता अल्लू अर्जुन सध्या त्याच्या आगामी ‘पुष्पा २’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‘पुष्पा’च्या अफाट यशानंतर, अभिनेता संपूर्ण भारताचा स्टार बनला आहे. आता त्याचे चाहते ‘पुष्पा’च्या पुढील सीक्वेन्सची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, अल्लू अर्जुनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो आपल्या कुटुंबासह जंगल सफारीचा आनंद लुटताना दिसत आहे.
अल्लू अर्जुनने सध्या ‘पुष्पा 2’च्या शूटिंगमधून ब्रेक घेतला असून तो आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. अभिनेत्याचा हा व्हिडिओ रणथंबोरचा आहे, जिथे त्याने दोन दिवस कुटुंबासोबत घालवले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार अल्लू अर्जुन पत्नी स्नेहा, मुलगा अयान आणि मुलगी अरहासोबत सिक्स सेन्सेस हॉटेलमध्ये दोन दिवस थांबला होता. यासोबतच त्यांनी या सुट्टीत अनेकवेळा जंगल सफारीचा आनंद लुटला.
नुकतीच बातमी आली होती की, ‘पुष्पा 2’ चे दिग्दर्शक सुकुमार चित्रपटाचा अभिनेता अल्लूचा वाढदिवस खास बनवण्याचा विचार करत आहेत. 8 एप्रिल रोजी अभिनेता त्याचा 41 वा वाढदिवस साजरा करणार आहे. अशात, अर्जुनच्या वाढदिवसाच्या या खास प्रसंगी सुकुमार अल्लू ‘पुष्पा 2’ मधून त्याचा फर्स्ट लुक शेअर करू शकतात किंवा यानिमित्ताने चित्रपटाचा टीझरही रिलीज होऊ शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.
‘पुष्पा: द राइज’ (पुष्पा 2) गेल्या वर्षी 17 डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट तामिळ, तेलगू, हिंदी, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात अल्लू अर्जुन लाल चंदन तस्कर पुष्पराजच्या भूमिकेत दिसला होता, तर रश्मिका मंदान्नाने श्रीवल्लीची भूमिका साकारली होती. या चित्रपटाने 110 कोटींची बंपर कमाई केली. दुसरीकडे, ‘पुष्पा 2’ च्या रिलीजबद्दल बोलायचे झाले तर, हा चित्रपट 2024 मध्ये थिएटरमध्ये दाखल होईल.