मंचर -ग्रामीण भागातील मुले एकत्र क्रिकेट किंवा इतर खेळ खेळतात. काही जण तर वेळ जात नाही म्हणून पत्ते खेळतात. अजूनही ग्रामीण भागामध्ये रोज बसायच्या सार्वजनिक ठिकाणी लोक एकत्र येऊन खूप वेळ घालवतात. रोजच काहीतरी शेतीची कामे, दवाखाना, भाजीपाला, किराणा आणायचा अशी नवीन कारणे शोधून व्यक्ती बाहेर सार्वजनिक ठिकाणी फिरायला बाहेर पडतात.
एक व्यक्ती दुसऱ्याच्या घरी गेल्यानंतर तो स्वतः काही काळजी घेत नाही व ज्या व्यक्तीच्या तो घरी गेला आहे तेही कोणत्याही प्रकारची काळजी घेत नाहीत. या सर्व धोकादायक सवयींमुळे ग्रामीण भागात करोनाचे रुग्ण आढळू लागले आहेत. करोनाचा संसर्ग थांबवणे खूप अवघड होणार असल्याचे मत आरोग्य विभागाने व्यक्त केले.
ग्रामसमितीने तसेच तरुण मुलांनी एकत्र येऊन अशा व्यक्ती शोधण्यासाठी प्रशासनास मदत करावी. प्रत्येक वॉर्डनिहाय ग्रामपंचायत सदस्यांनी देखील फिरते राहावे. स्वतःहून अशा काही व्यक्ती पुढे आल्या तर त्या व्यक्तीचे प्रोत्साहन वाढवण्यासाठी कौतुक करा. सर्व काही आरोग्य सेवकांनी, पोलिसांनी, ग्रामपंचायत प्रशासनाने करायला हवे ही मनातून काढून टाका. दिवसरात्र जागरूक रहा. मास्कचा नियमित वापर करा. शारीरिक अंतर पाळा करोना टाळा. घराबाहेर फिरू नका प्रशासनास सहकार्य केले पाहिजे.
-दत्ता गांजाळे, सरपंच मंचर
सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीसपाटील, प्राथमिक शिक्षक, आशा स्वयंसेविका, अंगणवाडीसेविका, अंगणवाडी मदतनीस यांचे काम आता जोखमीचे बनत चालले आहे. करोनाचा धोका वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्राने राज्यांना काही सूचना केल्या आहेत. जे लोक बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत त्यांच्यासाठी त्या त्या ठिकाणी राहण्याची आणि खाण्याची सोय करण्याच्या सूचना आधीच देण्यात आल्या आहेत. तरी पण काही व्यक्ती माणसे गावी येऊ लागली तर ग्रामीण भागातही करोनाचा शिरकाव होण्यास वेळ लागणार नाही. आणि मग आरोग्य यंत्रणेवर ताण येणार.
-डॉ. सचिन गाडे, वैद्यकीय तज्ज्ञ मंचर
शासकीय कर्मचारी यांना कळवून आपण उगाच कशाला विरोधात जायचे. असे समजून अनेकजण गप्प बसतात. इथेच ग्रामीण भागात करोनाचा शिरकाव होण्यास मदत करतो. अनोळखी व्यक्ती दिसली तर चौकशी करा. माहितीची व्यक्ती आहे. पण परगावाहून दाखल झाली आहे. नातेवाईक, मित्रपरिवार बाजूला ठेवा आणि 14 दिवसांच्या आत घराबाहेर ती व्यक्ती आली असेल तर पोलीस प्रशासनास माहिती कळवणे हे आपले कर्तव्य आहे.
-डॉ. गणेश पवार, मंचर उपजिल्हा रुग्णालय