ऍनस्थेशिया म्हणजे तात्पुरती, जरुरीनुसार संवेदनांची जाणीव बंद ठेवणे, ढोबळ मानाने याचे तीन प्रकार सांगता येतील, जागेवरची भूल (लोकल) जसा दात काढताना देतात, एखादा भाग बधिर करणे उदाहरणार्थ, कमरेखालील मणक्यातून देणारी भूल -पायाचे ऑपरेशन, सिझेरियन इत्यादीसाठी आणि पूर्ण भूल म्हणजे जनरल सनस्थेशिया. कोणतीही भूल घेताना रुग्णाने आपला पूर्व इतिहास पारदर्शीपणे आड पडदा न ठेवता भूलतज्ञांना सांगणे महत्त्वाचे आहे. भूलतज्ञ काही मिनिटांसाठी वा तासांसाठी आपल्या जीवाची रिस्क घेत असतात तर त्यांना सर्व न लपवता सांगणे हे रुग्णाचे कर्तव्य आहे. कोणताही सुजाण भूलतज्ञ जाणून रुग्णाचा जीव धोक्यात घालत नाही .
बरेचदा रुग्ण त्यांच्या तंबाखू इत्यादी सवयी , ऍलर्जी ,घेत असलेली इतर औषधे, सर्दी अशा गोष्टी लपवून ठेवतात. काही लोकांमध्ये अनुवंशिक कारणाने स्नायूशिथिलता बराच काळ राहण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्या जवळच्या नातेवाईकांना भुली दरम्यान काही विपरीत त्रास झाला असल्यास तोही भूलतज्ञांना अवश्य सांगावा. अजून एक सर्वसामान्यपणे आढळणारी गोष्ट म्हणजे,” मला बेशुद्ध करून टाका डॉक्टर” ही मागणी. रुग्णाची पूर्ण तपासणी करून, त्याचे सर्व रिपोर्ट वाचून त्याच्या प्रकृतीला व होणाऱ्या शस्त्रक्रियेला आवश्यक व सेफ अशी भूल तज्ञांना ठरवू द्यावी.
आपल्याला वाटणाऱ्या भीती पेक्षा आपला जीव जास्त महत्त्वाचा असतो हे लक्षात घ्यावे. इडली ऐवजी वडा मागण्या एवढे हे सोपे नाही. रुग्ण किती तास उपाशी आहे, अनियंत्रित रक्तदाब- मधुमेह ,वाढलेला वा कमी झालेला थायरॉईड, रक्तातील कमी जास्त क्षारांचं प्रमाण, हिमोग्लोबिनची कमतरता, रुग्णाला सर्दी खोकला असणे ,48 तासात केलेले मद्यपान व धूम्रपान इत्यादी, तसेच काही काही चालू असलेल्या औषधांची भूलीच्या औषधांची असलेली क्रॉस रिएक्शन विचारात घ्यावी लागते.इतरही अनेक गोष्टी बारकाईने बघाव्या लागतात. माणसाला जिवंत राहण्यासाठी सर्वात महत्त्वाचा त्याचा श्वास तो नीट राखणं हे प्रथम उद्दिष्ट असतं. कुठल्या डॉक्टरांना शस्त्रक्रियेनंतर आनंदी रुग्ण समाधान देणार नाही ?
पण या करता भुलतज्ञांवर विश्वास ठेवून त्यांच्याशी सर्व आधीच विस्ताराने बोलून घेण्याची गरज आहे .अफूच्या पानांपासून विकसित होत आजकाल बधिरीकरणशास्त्र अत्यंत प्रगत झाले आहे. चांगल्या व सेफ औषधांचे शोध लागत आहेत. सुसज्ज मॉनिटर व मशीन रुग्णसेवेला हजर आहेत. मग भीती कशाची? कारण भुली दरम्यान रुग्णाची मानसिकता ही फार मोठा फरक घडवत असते.तर ” बी पॉझिटिव्ह”!
==========================