Naseem Khan on MIM । देशात एकीकडे लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. आतापर्यंत दोन टप्प्यातील मतदान झाले आहे. हे सगळं सुरु असताना काँग्रेसमधील नाराजी नाट्य काही केल्या कमी होताना दिसत नाही. आता मुंबई काँग्रेसच्या वर्तुळातील प्रतिष्ठित नेत्यांपैकी एक असणारे नसीम खान हेदेखील हायकमांडवर प्रचंड नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या नाराजीनंतर आता त्यांना एमआयएमने ऑफर दिली आहे.
एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी तत्परतेने नसीम खान यांना आपल्या पक्षात येण्याची ऑफर दिली होती.मात्र, नसीम खान यांनी एमआयएमच्या या ऑफरवर काहीच बोलण्यास नकार दिला. ते शनिवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते.
मला याबाबत काहीही भाष्य करायचे नाही
यावेळी नसीम खान यांना एमआयएम पक्षाने दिलेल्या प्रस्तावाविषयी विचारण्यात आले. त्यावर नसीम खान यांनी म्हटले की, मला याबाबत काहीही भाष्य करायचे नाही. माझ्याविषयी सहानुभूती दर्शविली त्यासाठी मी धन्यवाद देतो. यापेक्षा अधिक मला बोलायचे नाही. मी काँग्रेस पक्षाचा कर्मठ कार्यकर्ता आहे, असे नसीम खान यांनी सांगितले. प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसची भूमिका राहिली आहे की, प्रत्येक जातीधर्माला न्याय मिळाला पाहिजे. पण दुर्दैव आहे की महाराष्ट्रात यंदा काँग्रेसने अल्पसंख्याक समाजाच्या एकाही व्यक्तीला उमेदवारी दिलेली नाही. त्यामुळे अल्पसंख्याक समाजात नाराजी आहे. राज्यातून अनेकजण मला फोन करुन रोष व्यक्त करत आहेत. तुम्ही वरिष्ठ नेते असताना काय अडचण आहे की तुम्हाला एकही उमेदवार देता आला नाही, असा सवाल मला अनेकजण विचारत आहेत, असे नसीम खान यांनी म्हटले.
एमआयएमची नक्की काय ऑफर दिली? Naseem Khan on MIM ।
नसीम खान यांना दिलेल्या प्रस्तावात जलील यांनी म्हटले की, नसीम खान यांनी स्टार प्रचारक पदाचा राजीनामा दिला आहे. पण त्यांनी पक्षालाच लाथ मारायला पाहिजे होती. नसीम खानजी, तुम्ही फक्त एकदा हिंमत दाखवा, त्यांना सोडा, आणि आमच्या पक्षात सामील व्हा. आम्ही तुम्हाला पूर्ण मदत करु. तुम्ही मुंबईतील कोणतीही जागा सांगा. आम्ही अगदी जाहीर केलेले उमेदवारही मागे घेऊ आणि तुम्हाला संधी देऊ, अशी खुली ऑफरच इम्तियाज जलील यांनी नसीम खान यांना देऊ केली होती.