नगर -मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख व उदयन गडाख यांची हत्या करण्याचा शिजवलेला कटाची व्हायरल ऑडियो क्लिपची चौकशी करून कडक कारवाई करावी, अशी मागणी शिवेसेनेच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांना केली. याबाबतचे निवेदन शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे, रावसाहेब खेवरे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना दिले. संबंधीतांवर योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन पोलीस अधीक्षकांना दिले.
मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख व त्यांचा मुलगा उदयन गडाख युवा नेते या दोघांची हत्या करण्याचा कटाची ऑडियो क्लिप गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रातील वातावरणात खळबळ उडाली. नेवासा तालुक्यामध्ये मागील काही दिवसांपासून अनेक प्रकारच्या अनुसूचित घटना घडत आहेत. नेवासा तालुक्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राहिलेली दिसत नाही. पोलीस प्रशासनाचा गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर वचक राहिलेला नाही.
शंकरराव गडाख यांचे तालुक्यामध्ये उत्कृष्ट असे काम असून त्यांनाच धमकावल्यामुळे वातावरण एकदम खराब झालेले आहे. तरी अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा योग्य बंदोबस्त आताच झाला नाही किंवा पोलीस प्रशासनाने याची योग्य दखल घेतली नाही तर पुढील काळात मोठी घटना घडल्याशिवाय राहणार नाही.
ज्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांचे ऑडियो क्लिपमध्ये संभाषण झालेले आहे, अशा लोकांवर योग्य कारवाई करून त्यांना ताबडतोब अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, मंत्री गडाख व त्यांचा मुलगा उदयन गडाख यांना योग्य ते संरक्षण देण्यात यावे, जेणेकरून पुढील अनर्थ टाळता येईल. यावेळी उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले, हरिभाऊ शेळके, तालुका प्रमुख राजेंद्र भगत, माजी जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष संपत म्हस्के, माजी उपाध्यक्ष प्रताप शेळके, पंकज लांभाते आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.