#T20WorldCup #INDvPAK | विश्‍वचषकात विजयारंभ करण्यास विराट सेना सज्ज

दुबई :- टी-20 विश्‍वचषक स्पर्धेमध्ये  आज (रविवारी) भारत आपला पहिला सामना खेळणार आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी असणाऱ्या पाकिस्तानविरोधातील सामन्याने भारत या स्पर्धेमध्ये पुन्हा जेतेपद जिंकण्यासाठीची मोहीम सुरू करणार आहे. या सामन्याकडे नेहमीप्रमाणे संपूर्ण क्रीडा विश्‍वाची नजर लागलेली आहे.

दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ पाकिस्तानविरुद्धचा नाबाद राहण्याचा विक्रम कायम ठेवण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. त्याचबरोबर बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान टी-20 विश्‍वचषक स्पर्धेत भारताला पहिल्यांदाच पराभूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल.

भारतीय संघातील आघाडीचे फलंदाज रोहित शर्मा, केएल राहुल आणि सुर्यकुमार यादव यांनी डावाला निर्णायक सुरुवात करून देणे आवश्‍यक आहे. तसेच मधल्या फळीत कर्णधार विराट कोहली, हार्दिक पांड्या, इशान किशन यांनी आक्रमक खेळी केल्यास संघाला मोठी धावसंख्या उभारता येवू शकते. या सामन्यात भारतीय गोलंदाजांसाठी सर्वात मोठे काम बाबर आझमला बाद करण्याचे असेल. कारण त्यावरून सामन्याची दिशा ठरणार आहे. तसेच फखर जमानमध्ये देखील सामना फिरविण्याची क्षमता आहे. 2017 मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात फखर जमानने शतक झळकावून पाकिस्तानला भारताविरुद्ध विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

दुसरीकडे पाकिस्तान संघाने आजच आपल्या 12 खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. संघ निवड समितीने संघात भारताविरुद्ध प्रभावी गोलंदाजांवर जास्त भर दिला आहे. पाकिस्तानी संघाचे नेतृत्व कर्णधार बाबर आझमकडे असणार आहे, तर संघात फलंदाजीची बाजू मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून संघात बदल केल्याचे पाहायला मिळत आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत आपली प्रतिक्रिया दिली. विराट कोहली म्हणाला, पाकिस्तानचा संघ मजबूत आहे. तुम्हाला प्रत्येक वेळी त्यांच्याविरुद्ध सर्वोत्तम खेळ खेळावा लागेल. त्यांच्या संघात असे काही खेळाडू आहेत, जे सामन्याचा कलाटणी देऊ शकतात. आम्ही पाकिस्तानविरुद्ध आमचा चांगल्या दर्जाचा खेळ नक्‍कीच दाखवू, असे त्याने सांगितले.

चार भारतीय क्रिकेटपटू मायदेशी परतणार

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मोठे पाऊल उचलले आहे. बीसीसीआयने टीम इंडियाच्या शिबिरात सहभागी असलेल्या चार क्रिकेटपटूंना परत मायदेशी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. यात शाहबाज नदीम, कृष्णप्पा गौतम, कर्ण शर्मा आणि व्यंकटेश अय्यर यांचा समावेश आहे. टी-20 विश्‍वचषकासाठी बीसीसीआयने आठ नेट गोलंदाजांची निवड केली होती.

यूएईहून परतलेले हे चारही गोलंदाज देशांतर्गत स्पर्धेचा भाग म्हणून सय्यद मुश्‍ताक अली ट्रॉफीमध्ये खेळणार आहेत. या चार गोलंदाजांच्या आगमनानंतर उम्रान मलिक, आवेश खान, हर्षल पटेल आणि लुकमन मेरीवाला यांना भारतीय संघासोबत कायम ठेवण्यात आले आहे. हे चार वेगवान गोलंदाज संपूर्ण विश्‍वचषकात संघासोबत राहणार आहेत.

संभाव्य संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, इशान किशन, शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्‍विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, भुवनेश्‍वर कुमार, वरुण चक्रवर्ती, राहुल चहर.

पाकिस्तान ः बाबर आझम (कर्णधार), असिफ अली, फखर झमन, हैदर अली, मोहम्मद रिझवान, इमरान वसीम, मोहम्मद हाफिज, शदाब खान, शोएब मलिक, हरिस रौफ, हसन अली, शाहिन शा आफ्रिदी.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.