सासवड, (प्रतिनिधी) – बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांनी सोमवारी (दि. 8) अचानक माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने बारामती लोकसभा मतदारसंघ कोणत्या ना कोणत्या करणाने कायम चर्चेत आहे. येथून खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार अशी नणंद-भावजयीमध्ये लढत होत आहे.
मात्र, महाविकास आघाडीतील भाजप नेते हर्षवर्धन पाटील आणि शिंदे गटातील विजय शिवतारेंनी घेतलेल्या विरोधी भूमिकेमुळे अजितदादांचे टेन्शन चांगलेच वाढले होते. त्यांचे बंड थंड करण्यात वरिष्ठांना यश आले आहे.
त्यानंतर सोमवारी (दि. 8) सासवड (ता पुरंदर) येथील शिवतारे यांच्या पुरंदरेश्वरा या निवासस्थानी सुनेत्रा पवार यांनी विजय शिवतारे यांची भेट घेतली या भेटीमुळे पवार व शिवतारे यांच्यातील शाब्दिक युद्ध थांबले यावर शिक्कामोर्तब झाले. दोघांमध्ये सासवडमधील जनसंवाद सभेच्या तयारीबाबत चर्चा झाली.
या भेटीत तुम्ही दिल्लीला जा, आम्ही तालुका सांभाळू, असे म्हणत शिवतारेंनी सुनेत्रा पवारांचे लोकसभा निवडणुकीत काम करणार असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, गुरुवारी (दि. 11) होणार्या मेळाव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सासवड येथील पालखी तळावर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. यावेळी महायुतीचे कार्यकर्तेही उपस्थित होते.