लोणीकंद/कोरेगाव भीमा, (वार्ताहर) – धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या 335व्या बलिदान दिनानिमित्त श्री क्षेत्र तुळापूर (ता. हवेली) व श्रीक्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे आज राज्यभरातून आलेल्या लाखो शंभूभक्तांनी समाधीस्थळावर अलोट गर्दी केल्याने समाधीस्थळ परिसर भगवामय झाल्याचे पाहायला मिळाले.
श्री क्षेत्र तुळापूर येथे पुणे जिल्हा परिषद पुणे, पंचायत समिती हवेली, पिंपरी चिंचवड महानगर पालिका, कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे व ग्रामपंचायत श्रीक्षेत्र तुळापूर यांच्या संयुक्त विद्यमाने तर श्रीक्षेत्र वढू बुद्रुक येथे ग्रामपंचायत वढू बुद्रुक, धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समिती व धर्मवीर संभाजीराजे युवा मंचच्या वतीने संपूर्ण दिवसभर समाधीस्थळी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
तुळापूर येथील शाहीर संतोष साळुंखे यांच्या पोवाड्यांनी अंगावर शहारा येत होता. दरम्यान बलिदानदिनी सकाळीच धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या बलिदाननंतर न निघू शकलेल्या अंत्ययात्रेचे स्मरण म्हणून काढण्यात आलेल्या मूक पदयात्रेस शंभू भक्तांनी गर्दी केली होती.
यावेळी खासदार अमोल कोल्हे, खासदार उदयनराजे भोसले, आमदार अशोक पवार, महेश लांडगे, बाप्पू पठारे, महाराणा प्रतापसिंह महाराजांचे वंशज लक्षराजसिंह महाराज, जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांचे वंशज माणिक महाराज मोरे, मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील, शंकर गायकर, राहुल सोलापूरकर, तुळापूरच्या सरपंच गुंफा इंगळे, उपसरपंच जयश्री शिवले,
वढूच्या सरपंच अंजली शिवले, माजी सरपंच प्रफुल्ल शिवले, अनिल शिवले, सारिका अंकुश शिवले, उपसरपंच राहुल ओव्हाळ, धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समिती कार्यवाहक मिलिंद एकबोटे, अध्यक्ष सोमनाथ भंडारे, लक्ष्मण भंडारे, शांताराम भंडारे, युवा मंचचे मार्गदर्शक सचिन भंडारे, अध्यक्ष अनिल भंडारे, वढूचे ग्रामविकास अधिकारी शंकर भाकरे,
तुळापूरचे ग्रामविकास अधिकारी गणेश वालकोळी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, शिक्रापूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक दीपरतन गायकवाड, लोणीकंद पोलीस स्टेशनचे निरीक्षक कैलास करे, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ तसेच हजारोंच्या संख्येने शंभूभक्त उपस्थित होते. दरम्यान राज्यभरातून असंख्य शंभूभक्तांचे ज्योत घेऊन समाधी स्थळावर आगमन झाल्याने सर्वत्र छत्रपती श्री शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.
वढूमध्ये अवतरले राम मंदिर
पुर्णाकृती पुतळ्याच्या मेघडंबरीवर आकर्षक फुलांच्या सजावटीत राम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आल्याने मेघडंबरिस एक वेगळेच रूप आले होते. संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा, संभाजी महाराज समाधी, कवी कलश समाधीसह मुख्य प्रवेशद्वाराला केलेली आकर्षक फुलांची सजावट लक्ष वेधून घेत होती.
बलिदान दिनी शंभू भक्तांसाठी महाप्रसाद
श्रीक्षेत्र वढू बुद्रुक येथे येणार्या लाखो शंभू भक्तांसाठी धर्मवीर संभाजीराजे युवा मंच व ग्रामपंचायत वढू बुद्रुक यांनी तर श्रीक्षेत्र तुळापुर येथे शंभूराजे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने दिवसभर अन्न प्रसादाचे नियोजन करण्यात आले होते. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी पिंपरी चिंचवड येथील दत्ता बुट्टे व मित्र परिवाराच्या वतीने पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती.